सिग्नल मोडल्याने कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारचालकाने मारहाण केल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी परिसरात घडली.
या प्रकरणी मोटारचालक बाळकृष्ण जयराम टाळके (वय ३२, रा. निओ सिटी सोसायटी, बकोरी रस्ता, वाघोली) याला अटक करण्यात आली. याबाबत विमानतळ वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी आनंद गोसावी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- पुणे : ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकर यांना राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार

मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल

खराडी बाह्यवळण मार्गावरील चौकात पोलीस कर्मचारी गोसावी वाहतूक नियमन करत होते. त्या वेळी मोटारचालक टाळके सिग्नल मोडून पुढे गेल्याने पोलीस कर्मचारी गोसावी यांनी मोटार थांबविण्याची सूचना केली. सिग्नल का मोडला ? अशी विचारणा गोसावी यांनी केली. तेव्हा टाळकेने त्यांच्या गणवेशाचे बटण तोडले. ‘पोलिसांना खूप मस्ती आली आहे, ’ असे म्हणून टाळकेने गोसावी यांना धक्काबुक्की केली. गोसावी यांनी त्याला रोखले. गोसावी आणि वाहतूक शाखेतील सहकाऱ्यांनी टाळकेला ताब्यात घेतले. टाळकेच्या विरोधात सरकारी कामात अडथळा तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने तपास करत आहेत.