लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पोटात लाथ मारण्याची घटना हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका मोटारचालकाला अटक केली तसेच दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मारुती राजाराम माने (वय २२, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सोनू पाटकर, तसेच आणखी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हांडेवाडी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई अजिंक्य नानगुडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-दहावी, बारावीची परीक्षा यंदा लवकर; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखा जाहीर

पोलीस शिपाई नानगुडे हांडेवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी हांडेवाडी भागात कोंडी झाली होती. मोटारचालक मारुती माने याने कोंडीतून मोटार नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नानगुडे यांनी त्याला मोटार थांबविण्यास सांगितले. माने आणि मोटारीतील साथीदार पाटकर यांनी नानगुडे यांना शिवीगाळ केली. नानगुडे यांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्याने मानेने नानगुडे यांच्या पोटात लाथ मारली, तसेच कठीण वस्तू त्यांच्या हातावर मारली.

त्यावेळी तेथे असलेल्या एका मोटारचालकाने नानगुडे यांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण केल्याप्रकरणी मोटारचालक मानेला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorist arrested for kicking traffic police pune print news rbk 25 mrj
Show comments