इमारतीच्या छतावर पहाडी पोपट तसेच लव्हबर्डला पिंजऱ्यात कोंडून निर्दयीपणे वागविल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. वनविभाग तसेच पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पक्ष्यांची सुटका केली. रास्ता पेठ भागात ही कारवाई करण्यात आली.
रहेमतुल्ला शौकतउल्ला खान (वय ५७, रा. पेंशनवाला मशीदीसमोर, रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे. खान यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वनसंरक्षक काळुराम कड यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान यांनी इमारतीच्या छतावर एका पिंजऱ्यात बजरी जातीचे १२६ लव्हबर्ड आणि तीन पहाडी पोपट ठेवल्याची तक्रार वनसंरक्षक कड यांच्याकडे करण्यात आली होती. एकाच पिंजऱ्यात पक्ष्यांना कोंडून त्यांना निर्दयी वागूणक देण्यात येत असल्याचे तक्रारदाराने सांगितले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक आणि वनसंरक्षक कड यांनी कारवाई केली. इमारतीच्या छतावर पाळलेल्या पिंजऱ्यातून १२६ लव्हबर्ड आणि तीन पहाडी पोपटांची सुटका करण्यात आली, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुटका करण्यात आलेले पोपट आणि लव्हबर्ड बावधन येथील वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या रेस्क्यु संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय थोरात, अमोल पवार, अजय जाधव, तुषार माळवदकर, महेश बामगुडे आदींनी ही कारवाई केली.
खान यांनी पहाडी पोपट, बजरी जातीचे लव्हबर्ड कोठून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mountain parrot lovebird carrier arrested forest department releases lovebirds three parrots pune print news amy
First published on: 18-05-2022 at 18:09 IST