पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रसरकारला धारेवर धरले आहे. महागाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अवाक्षर काढत नाहीत. पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या गेले आहेत. कोणाला शुभेच्या द्यायच्या झाल्यास पेट्रोल आणि डिझेल दरापेक्षा तुझ्या आयुष्यात भरभराट जास्त होऊ दे अशा शुभेच्छा द्याव्या लागत असल्याचा मिश्किल टोला कोल्हे यांनी लगावला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार अमोल कोल्हे बोलत होते. 

“आज देशातील परिस्थिती बघितली तर शेतकरी, कष्टकरी वर्ग यांच्या विरोधात कायदे आले आहेत. हे सर्व होत असताना लखीमपूरची दुर्दैवी घटना घडली. एका केंद्रीय राज्य मंत्र्यांचा मुलगा निर्दयीपणे आंदोलनाला जाणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले, असा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर आजही मंत्री पदावर ती व्यक्ती बसून आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी अवाक्षर काढलं नाही. जेव्हा, जेव्हा जनतेच्या हिताचे प्रश्न असlतात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौन साधून असतात. महागाई वाढली, पेट्रोल, डिझेल दरवाढ झाली पंतप्रधान काही ही बोलणार नाहीत, असे अमोल कोल्हे म्हणाले.

“पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. कोणाला शुभेच्या द्यायच्या झाल्यास पेट्रोल आणि डिझेल दरापेक्षा तुझ्या आयुष्यात भरभराट जास्त होऊ दे अशा शुभेच्छा द्याव्या लागत आहेत. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. याबद्दल बोलायला देशात कोणी नाही, हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचा, कष्टकाऱ्यांचा, मध्यमवर्गीयांचा आवाज दडपला जात आहे. अशा वेळी ८० वर्षाचा तरुण पुन्हा एकदा मैदानात उतरतो त्यामुळं ही लढाई सत्येची राहात नाही तर विचारांची लढाई होते,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

“मोफत लस द्यावी लागत असल्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ होते हे ७० वर्षात असे कधी झालं नाही. देवी, गोवर, पोलिओ लस निघाली म्हणून कधी पेट्रोल, डिझेलला जास्त पैसे द्यावे लागले नाहीत. मग आत्ताच लस द्यावी लागत आहे म्हणून जनतेच्या खिशात हात घालून पेट्रोल आणि डिझेलच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत,” असे अमोल कोल्हे म्हणाले.

“अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराला तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपले आहे. मात्र भाजपाची सत्ता आल्यापासून भ्रष्टाचार बोकाळला आहे. सत्ताधारी पक्षाला आव्हान देतो, गेल्या पाच वर्षात पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या माध्यमातून जनतेच्या हिताची भ्रष्टाचारमुक्त असलेली दहा कामे दाखवा परत पिंपरी-चिंचवड शहरात पाय ठेवणार नाही. फक्त दहा कामे दाखवा ज्यात भ्रष्टाचार नाही, आणि जनतेच्या हिताची आहेत,” असे आव्हान अमोल कोल्हे यांनी सत्ताधारी भाजपाला दिले आहे.