पुणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे आणि त्यांची कन्या आसावरी जगदाळे यांच्यासमवेत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आसावरी यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव श्रीकर परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. तसेच, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. दोघांनीही या विषयात तत्परतेने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रा. डाॅ. कुलकर्णी यांनी दिली.

‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची कन्या आसावरी यांना शासकीय सेवेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला दहा महिने उलटल्यानंतर या विषयाची तातडीने दखल घ्यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, तसेच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. आसावरी उच्चशिक्षित असून, त्यांनी एमबीए केलेले आहे. त्यामुळे महानगरपालिकेत तिला प्रशासकीय पदावर किंवा वर्ग दोन श्रेणीतील नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे,’ असेही प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले.