लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोथरूड भागातील गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याने नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचा सत्कार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लंके यांच्या सत्कार समारंभाची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मारणे पुन्हा चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी मारणेची भेट घेतल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती.

मारणे याची कोथरूड भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. मारणे याने खासदार लंके यांचा सत्कार केल्याची चित्रफीत प्रसारित झाली. चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेब्रुवारी महिन्यात पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी गज्या मारणे, निलेश घायवळ, सचिन पोटे, बाबा बोडके टोळीसह शहरातील वेगवेगळ्या भागात दहशत असलेल्या गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांना समज दिली. गंभीर गुन्हे केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला, तसेच दहशत निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

आणखी वाचा-पुणे : बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण

पोलीस आयुक्तालयात गुंड गज्या मारणेला बोलावून गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दम भरला. त्यानंतर गज्या मारणे, निलेश घायवळसह शहरातील वेगवेगळ्या भागात दहशत असलेल्या टोळ्यांकडून समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

घायवळचे नगर कनेक्शन आणि मारणेची चाल

एकेकाळी गज्या मारणे याचा निकटचा साथीदार अशी ओळख निलेश घायवळ याची होती. कोथरुड भागात दोघांचा दबादबा आणि दहशत होती. मारणे आणि घायवळ यांच्यात वर्चस्व, आर्थिक व्यवहारातून खटके उडू लागले. मारणे आणि घायवळ टोळ्यांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आणि टोळीयुद्धाचा भडका उडाला. टोळीयुद्धातून घायवळवर हल्ला झाला, तसेच त्याच्या साथीदारांचे खून झाले. घायवळने मारणे टोळीवर सूड घेण्यासाठी त्याच्या सचिन कुडलेवर दांडेकर पूल गोळीबार करून त्याचा खून केला. घायवळ मूळचा नगर जिल्ह्यातील जामखेडमधील आहे. गेल्या काही वर्षांपासून घायवळने कर्जत, जामखेड परिसरात दबदबा निर्माण केला आहे. घायवळला शह देण्यासाठी मारणे खासदार निलेश लंकेंचा सत्कार करून वेगळी चाल खेळली, अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू झाली आहे.