खासदार राजू शेट्टी यांची टीका
उद्योजकांवर कृपादृष्टी दाखवणाऱ्या सरकारकडून शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित ठेवण्यात येत आहेत. पंतप्रधान, अर्थमंत्र्यांनी उद्योजकांच्या थकीत कर्जासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली. मात्र, शेतकऱ्याच्या २० हजारांच्या कर्जासाठी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते, सरकारला याची लाज वाटली पाहिजे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा ही तर सुरुवात आहे, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्तीच हवी, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे रास्ता रोको आंदोलन झाले, या वेळी त्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. शेट्टी म्हणाले, उद्योगपतींनी करोडो रुपये कर्ज बुडवले, विजय मल्या नऊ हजार कोटी बुडवून पळून गेला, त्यांच्यावर कारवाई होत नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी घेता, त्यावर आरक्षणे टाकता, मग त्यांचे प्रश्न का सोडवले जात नाहीत. शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. अनेक राजवटी बदलल्या, मात्र ती प्रवृत्ती बदललेली नाही. शेतकऱ्यांच्या बाजूने दबावगट होत नाहीत, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे. शेतीमालाच्या किमती पाडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो.