पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार, पुन्हा पार्थ पवार लढणार का, माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे मावळच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी भाष्य केले आहे.
पार्थ पवार, आदिती तटकरे दोघांपैकी कोण उमेदवार विरोधात असल्यावर लढत सोपी होईल असे विचारले असता खासदार बारणे म्हणाले, मी गेली अनेक वर्षे राजकारणात काम करत आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून मी कधीही काम केलेले नाही. जनमानसात जाऊन, सर्वसामान्यांची कामे सोडविण्याचे काम करतो. अधिक वेळ जनतेसाठी देतो. माझ्यासमोर कोण उमेदवार आहे हे पाहून मी निवडणूक लढलो नाही. येणाऱ्या निवडणुकीत कोणतरी उमेदवार राहणार आहे.




हेही वाचा >>> पुणे लोकसभेबाबत काँग्रेसचा आज फैसला…काय घेणार निर्णय?
विरोधी पक्ष कोणाला तरी उमेदवारी देणार आहे. मी मावळ लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीला लोक संपर्काच्या जोरावर सामोरे जाणार आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही. भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबाबत विचारले असता बारणे म्हणाले, प्रत्येक पक्षाला संघटना वाढविण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. भाजपने यापूर्वीही लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पक्ष बांधणीचे काम केले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजप कार्यकर्ते, नेत्यांनी मला मदत केली आहे. पक्ष वाढविण्याच्या दृष्टिकोनातून भाजप संघटनात्मक बांधणी करत आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार असल्याचेही ते म्हणाले.