पुणे : पुणे परिसरात गृहप्रकल्पांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यासाठी काँक्रीटचा पुरवठा करणारे रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही वाढत आहे. अनेक ठिकाणी या प्रकल्पांकडून नियमांचे उल्लंघन सुरू असून, त्यामुळे हवा प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गेल्या वर्षीपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील २५ टक्क्यांहून अधिक आरएमसी प्रकल्पांना टाळे ठोकले आहे.

आरएमसी प्रकल्पांमुळे होत असलेल्या हवा प्रदूषणाचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी वाकड परिसरात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात आंदोलन केल्याने त्याची तीव्रता समोर आली होती. तसेच, इतरही अनेक ठिकाणी आरएमसी प्रकल्पांमुळे हवा प्रदूषणात वाढ होत असल्याची तक्रारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी जानेवारीपासून आरएमसी प्रकल्पांवर कारवाईचे पाऊल उचलले. त्यात आरएमसी प्रकल्पांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत आतापर्यंत नियमांचे गंभीर उल्लंघन करणारे ८४ आरएमसी प्रकल्प बंद करण्याची कारवाई करण्यात आली.

पुणे जिल्ह्यात एकूण ३५० आरएमसी प्रकल्प आहेत. त्यापैकी पुण्यात १०५, पिंपरीं-चिंचवडमध्ये १२२ आणि ग्रामीण भागात १२३ आरएमसी प्रकल्प आहेत. प्रदूषण नियमांचा भंग केल्याप्रकरणी १०३ आरएमसी प्रकल्पांना कारवाईची पहिली नोटीस बजाविण्यात आली. तसेच, १२ प्रकल्पांना पुढील कारवाईची दुसरी नोटीस बजावली गेली. याचबरोबर ८४ प्रकल्प बंद करण्याची कारवाई झाली. तसेच, १४ आरएमसी प्रकल्पांनी नियमांची पूर्तता केल्याने त्यांना पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी दिली.

बंद करूनही प्रकल्प चालूच

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्प बंद करण्याची कारवाई करूनही काही प्रकल्प सुरूच असल्याचे आढळले आहे. मंडळाकडून केवळ कागदोपत्री कारवाई होत असून, त्याचे दृश्य परिणाम दिसून येत नाहीत. हवेची खराब गुणवत्ता कायम असून, नागरिकांच्या तक्रारीही तशाच आहेत. काही प्रकल्पांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्यानंतर ते जनित्रावर सुरू आहेत. याच वेळी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेल्या प्रकल्पांनी टँकरचे पाणी वापरण्याची पळवाट शोधली आहे. त्यामुळे असे बेकायदा सुरू असलेले प्रकल्प शोधून ते लाखबंद करण्याचे पाऊल मंडळाने महसूल विभाग, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या मदतीने उचलले आहे, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले.

आरएमसी प्रकल्पांमुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी मंडळाकडे येत आहेत. त्यानुसार मंडळाने कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यात गेल्या वर्षीपासून आतापर्यंत ८४ आरएमसी प्रकल्प बंद करण्याची कारवाई करण्यात आली. मंडळाकडून आरएमसी प्रकल्पांची तपासणी सातत्याने सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. – बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन आरएमसीचालकांककडून केले जात आहे. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी परंतु, आरएमसी प्रकल्पांसाठी शासकीय यंत्रणांची एकसमान नियमावली नाही. त्यामुळे प्रत्येक यंत्रणांकडून वेगवेगळ्या नियमांवर बोट ठेवले जाते. त्यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून त्यावर तोडगा काढावा. – प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष, पुणे आरएमसी असोसिएशन

पुण्यातील आरएमसीवरील कारवाई

एकूण आरएमसी – ३५०

पहिली नोटीस – १०३

दुसरी नोटीस – १२

टाळेबंदी – ८४

पुन्हा सुरू करण्यास परवानगी – १४