महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच एमपीसीबी सध्या गॅसवर असल्याचे चित्र आहे. आधीच अपुरे मनुष्यबळ असलेल्या मंडळात आता कामासाठी अधिकारीच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे उद्योगांसाठीच्या परवानग्या प्रलंबित राहण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी, दोन उपप्रादेशिक अधिकारी आणि तीन क्षेत्रीय अधिकारी अशा सहा जणांना नुकतेच निलंबित करण्यात आले. या अधिकाऱ्यांच्या विरोधात लाच घेतल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे मंडळाने कठोर कारवाई करून सहा जणांना निलंबित केले. या कारवाईनंतर पुण्यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रातील कार्यालयात मंडळाकडून तातडीने नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार ठाण्यातील प्रादेशिक अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. याच वेळी एका उपप्रादेशिक अधिकाऱ्याचा कार्यभार सातारा आणि दुसऱ्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याचा कार्यभार अहिल्यानगर येथील अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे.
पुणे कार्यालयांंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा हे जिल्हे आहेत. पुणे कार्यालयात एक प्रादेशिक अधिकारी आणि तीन उपप्रादेशिक अधिकारी अशी पदे आहेत. आता केवळ एक उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयात उरला आहे. एक प्रादेशिक अधिकारी आणि दोन उपप्रादेशिक अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार इतर ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. हे अधिकारी त्यांचे मूळ ठिकाणचे काम सांभाळून आठवड्यातून दोन दिवसांतून पुणे कार्यालयात हजेरी लावत आहेत. मंडळाचा सुधारित आकृतिबंध काही दिवसांपूर्वी मंजूर झाला. त्यानुसार मंडळात ३० टक्केच मनुष्यबळ कार्यरत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आकृतिबंधानुसार भरती प्रक्रिया अद्याप झालेली नाही. आता पुणे कार्यालयाचा विचार करता ३० टक्के मनुष्यबळात कार्यरत असलेल्या सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे हे प्रमाण १० टक्क्यांवर आले आहे.
मंडळाकडून उद्योग उभारणीसाठी परवानगी, उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी आणि परवानगीचे नूतनीकरण अशी प्रमुख कामे केली जातात. याचबरोबर प्रदूषणाशी निगडित विविध गोष्टींची जबाबदारी मंडळावर आहे. प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे काम मंडळाला करावे लागते. याचबरोबर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (एनजीटी) दाखल विविध प्रकरणांमध्ये मंडळाला बाजू मांडावी लागते. तसेच, बांधकामांनाही मंडळाकडून परवानगी दिली जाते. अशा विविध प्रकारच्या कामांसाठी सध्या मंडळाचा गाडा केवळ अतिरिक्त कार्यभारावर चालू आहे. अतिरिक्त कार्यभार असलेला अधिकारी आठवड्यातून केवळ दोनच दिवस देऊ शकत असेल, तर काम कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे कार्यालयातील प्रादेशिक अधिकाऱ्याकडे दररोज ३० ते ४० अर्ज येतात. याचबरोबर एका उपप्रादेशिक अधिकाऱ्याकडे १० ते १५ अर्ज येतात. यातील सर्व अर्जांचा त्याच दिवशी निपटारा शक्य होत नाही. उद्योगांनुसार त्यांची लाल, नारंगी आणि हिरवा अशी वर्गवारी केली जाते. त्यातील लालसाठी ९० ते १२० दिवस, नारंगीसाठी ६० दिवस आणि हिरव्यासाठी ३० दिवसांत अर्जाचा निपटारा काढण्याची मुदत असते. ही मुदत संपल्यानंतर त्या अर्जावर कार्यवाही करता येत नाही. त्या अधिकाऱ्याच्या नावावर या मुदतबाह्य अर्जाची नोंद होते. या अधिकाऱ्याला याबाबत लेखी खुलासा मुख्यालयाकडे सादर करून मुदतीत अर्ज निकाली न काढण्याची कारणे द्यावी लागतात. आताची परिस्थिती पाहता तोकड्या मनुष्यबळामुळे अर्ज निकाली निघण्याचे प्रमाण आणखी कमी होऊन प्रलंबित अर्जांची संख्या वाढेल, असे मंडळातील अधिकारी सांगत आहेत.
शनिवारी, रविवारीही काम
मंडळाकडून परवानगी देण्याच्या अर्जावर ऑनलाइन पद्धतीने काम केले जाते. आठवड्यातील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी अर्ज निकाली निघत नसल्याने सर्व अधिकारी ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शनिवारी आणि रविवारी अर्ज निकाली काढतात. यातून प्रलंबित अर्जांची संख्या कमी होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत मंडळातील अतिरिक्त कार्यभार असलेले अधिकारी त्यांच्या मूळ ठिकाणचे काम करून पुण्यातील कामाला कसा न्याय देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
sanjay.jadhav@expressindia.com
