पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मसाज पार्लरच्या आड वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या एका दलालाविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली असून, त्याला एक वर्षांसाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

धनराज शामराव जाधव असे कारवाई केलेल्या सराइताचे नाव आहे. जाधव याच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये पुणे, छत्रपती संभाजीनगर, ठाणे शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जाधव हा गरजू तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत होता. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. गेल्या वर्षी १४ जानेवारी रोजी जाधव याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो पसार झाला होता. जाधव याने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई परिसरात मसाज पार्लर सुरू केली होती.

जाधव याच्याविरुद्ध २०२४ मध्ये वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. जाधव हा ७ फेब्रुवारी रोजी वानवडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले. जाधव याला नागपूर कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले.