पुणे : राज्यात दुष्काळाचे संकट असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसीसी) कृषी सेवा परीक्षेतून निवड करण्यात आलेले २५८ कृषी अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तत्काळ नियुक्तिपत्र न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा या उमेदवारांनी दिला आहे.

एमपीएससीच्या माध्यमातून २०२४ साली कृषी सेवा परीक्षा घेण्यात आल्या. त्यातून निवडलेल्या ४८ कृषी उपसंचालक, ५३ तालुका कृषी अधिकारी आणि १५७ कनिष्ठ कृषी अधिकारी या पदांसाठी २५८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. एमपीएससीकडून जून २०२६ मध्येच अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर किमान तीन महिन्यांमध्ये या उमेदवारांना नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. मात्र, आता दोन वर्षे उलटूनही हे कृषी अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी रखडल्याचे कारण यापूर्वी राज्य सरकारकडून देण्यात येत होते. मात्र, २१ आणि २२ जुलै २०२६ ला जवळपास सर्वच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून, चारित्र्य आणि वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीही पूर्ण झाल्याची माहिती या उमेदवारांनी दिली. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कृषी अधिकाऱ्यांना आठ दिवसांमध्ये नियुक्ती देण्याचे निर्देश दिले होते. याबाबत त्यांनी १६ सप्टेंबरला समाजमाध्यमावर माहितीही दिली होती.

राज्यातील शेतकऱ्यांना योजनांची माहिती, तांत्रिक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. एकीकडे दुष्काळाचे सावट असताना नियुक्त्या रखडल्या, तर कृषी विभागाच्याही कामकाजावर परिणाम होऊ शकतो. पात्र उमेदवारांनाही नियुक्त्यांसाठी आंदोलन करावे लागणार आहे का? राज्य सरकारने या प्रक्रियेत तातडीने हस्तक्षेप करावा. नियुक्तीचे आदेश तातडीने द्यावेत. – कृषी सेवेतील पात्र उमेदवार

या सर्व उमेदवारांच्या विविध प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित प्राधिकरणाकडून करून घेणे अनिवार्य आहे. ती प्रक्रिया विभागाने स्वतः प्रत्येक अन्य विभागाशी पाठपुरावा करून जवळपास पूर्ण केलेली आहे. याबाबत शासन आदेश होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल. – सूरज मांढरे, कृषी आयुक्त