पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यात राज्य सेवा परीक्षा २०२१ सह एकूण तेरा परीक्षांचा समावेश असून, एमपीएससीने यंदा पहिल्यांदाच निकालाचा महिनाही वेळापत्रकात समाविष्ट केला आहे. 

आयोगातर्फे २०२१ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पदभरती परीक्षांतील काही परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर राज्य सेवा परीक्षा २०२२ सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा २०२१, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२, महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ अशा काही परीक्षांच्या जाहिराती मार्चपासून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा २०२२ ची पूर्व परीक्षा १९ जून ते ऑगस्ट, मुख्य परीक्षा १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान घेतली जाईल, तर निकाल जानेवारी २०२३ मध्ये जाहीर होईल. ८ ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ होणार आहे. या परीक्षेअंर्गत विविध पदांच्या परीक्षा २४ डिसेंबर ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान होतील. या परीक्षांचा निकाल फेब्रुवारी २०२३ मध्ये जाहीर करण्यात येईल. २५ नोव्हेंबर ते जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२  होणार आहे. त्यातील विविध पदांच्या परीक्षा १८ मार्च ते २३ एप्रिल दरम्यान होतील. तर निकाल मे २०२३ मध्ये जाहीर केला जाईल. ५ नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२  होईल. त्यातील विविध पदांच्या परीक्षा ४ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान होणार असून, निकाल एप्रिल २०२३ मध्ये जाहीर केला जाईल. सविस्तर वेळापत्रक  https://mpsc.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

..तरच परीक्षा वेळापत्रकानुसार घेणे शक्य

 शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. जाहिरातीच्या, परीक्षेच्या प्रस्तावित महिना, दिनांकात बदल होऊ शकतो.  शासनाकडून मागणीपत्र वेळेत प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यात पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे, परीक्षा घेणे शक्य होईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

उमेदवारांना परीक्षा प्रक्रियेचा अंदाज येण्यासाठी पहिल्यांदाच अंदाजित वेळापत्रकासह निकालाचा महिनाही देण्यात आला आहे. निकालाचा महिना तरी कळावा अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्याचा आयोगाने सकारात्मक विचार केला आहे. 

सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी