पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ चा सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. तसेच सुधारित गुणवत्ता यादी, शिफारस यादीही जाहीर करण्यात आली.
एमपीएससीने २९ सप्टेंबरला वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर केला होता. या निकालाच्या विरोधात काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली होती.
या संदर्भात मॅटने ४ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार एमपीएससीने उमेदवारांना ऑिप्टग आऊटचा (भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे) पर्याय दिला. उमेदवारांचे पसंतीक्रम आणि समान गुण असलेल्या उमेदवारांच्या प्राधान्य क्रमवारीबाबतची कार्यनियमावलीतील तरतूद लक्षात घेऊन निकाल सुधारित करण्यात आला.
शिफारसपात्र उमेदवारांची संबंधित प्रवर्गासाठीची पात्रता, प्रमाणपत्रांची सत्यता आणि वैधता सक्षम प्राधिकरणांकडून तपासण्याच्या अटीवर शिफारस करण्यात आली आहे. तर वनक्षेत्रपाल गट ब संवर्गाच्या अनुसूचित जातीजमाती महिला वर्गवारीतील एका पदाचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राखून ठेवण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पसंतीक्रमासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० साठी पदांचे पसंतीक्रम आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय निवडण्यासाठी एमपीएससीने प्रशासकीय कारणास्तव मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना २७ जूनपर्यंत पर्याय निवडता येईल.