पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत केलेले बदल २०२३ ऐवजी २०२५ पासून करण्याच्या मागणीसाठी नुकतेच स्पर्धा परीक्षार्थींनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन केले होते. मात्र आता राज्यसेवेतील बदल २०२३पासूनच लागू करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थी रस्त्यावर उतरत असून, शुक्रवारी सकाळी दहा वाजता अलका टॉकिज चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे  परीक्षार्थींमध्येही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अजित पवारांच्या काँग्रेसला कानपिचक्या; म्हणाले, “जर सत्यजीत तांबेंना…!”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी पुण्यात आंदोलन केले. आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार, सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच आंदोलनस्थळावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता फडणवीस यांनी राज्यसेवेतील बदल २०२५पासून लागू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून २०२५पासून बदल लागू करण्याची विनंती केली. आता घटनात्मक संस्था असलेल्या एमपीएससीने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ स्पर्धा परीक्षार्थी रस्त्यावर उतरत आहेत. राज्यसेवेतील बदल २०२३पासूनच लागू करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थी शुक्रवारी सकाळी दहा वाजता अलका टॉकिज चौकात आंदोलन करणार आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात आणि समर्थनार्थ असे स्पर्धा परीक्षार्थींचे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc aspirants to protest for implementation of descriptive pattern of mpsc exam from 2023 pune print news ccp 14 zws
First published on: 02-02-2023 at 19:39 IST