पुणे : आंदाेलनाची परवानागी रद्द केल्याची माहिती दिल्यानंतर नवी पेठेतील लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावर बेकायदा आंदोलन केल्या प्रकरणी एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या आंदोलनामुळे शास्त्री रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली, तसेच सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पोलीस हवालदार समीर पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण पाटील, ऋषीकेश गांगुर्डे, प्रियांका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभुळकर, साहेबराव क्षीरसागर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींनी २५ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. २ ऑक्टोबर रोजी, लोकमान्य टिळक चौक (अलका टाॅकीज), अहिल्या अभ्यासिका आणि नवी पेठेतील गांजवे चौक परिसरातील एस. एम. जोशी पूल परिसरात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली. ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आलेा. आंदोलनासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींना देण्यात आली होती.

त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास नवी पेठेतील इंदूलाल काॅम्प्लेक्ससमोर विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले. विद्यार्थी प्रतिनिधींनी परवानगी नसताना आंदोलन सुरू केले. आंदोलन सुरू केल्यानंतर वाहने अडविण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे तपास करत आहेत.

सरकारची दडपशाही; गुन्हे मागे घेण्याची मागणी

एमपीएससी परीक्षार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) शहराध्यक्ष विशाल तांबे यांनी निषेध केला. ‘एकीकडे सरकार चर्चेचे नाटक करत आहे. परीक्षार्थ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे. मागण्या मान्य झाल्याचे सांगून गुन्हे दाखल करणे ही दुटप्पी भूमिका आहे. परीक्षार्थ्यांच्या पाठीशी आम्ही सर्व शक्तीनिशी उभे राहू. त्वरीत गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल’, असा इशारा तांबे यांनी दिला आहे.