पुणे : चौकशी होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी रात्री दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही तत्वतः हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी सायंकाळी उशिरा भेट देऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात येणार असून, आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची, तर सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,’ अशी घोषणाही त्यांनी केली.

समितीच्या चौकशीची व्याप्ती केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित न ठेवता पेपरफुटी झालेल्या सर्व परीक्षांचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील पुरावे समितीसमोर सादर करता येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

चौकशी आयोगात कोण?

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली असून, आयोगाच्या अध्यक्षपदी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांची नियुक्ती केली आहे. सचिवपदी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह माजी न्यायाधीश पी. डी. नाईक, पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचा या समितीत समावेश आहे.

भीमनावर काय म्हणाले?

‘‘एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. ‘एमपीएससी’ची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल,’ अशी प्रतिक्रिया आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी समाजमाध्यमांवर दिली.