पुणे : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने सुरू झालेल्या आंदोलनात आता तिसरी चूल मांडण्यात आली आहे. एमपीएससीची स्वायत्तता टिकणे, वर्णनात्मक परीक्षा पद्धती कायम ठेवणे या मागण्यांसाठी टिळक चौक येथे स्वतंत्र आंदोलन करण्यात येत आहे.

एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यात स्पर्धा परीक्षांचा मुद्दा तापला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने झाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आमदार रोहित पवार यांनी आंदोलन एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी एस. एम. जोशी पूल येथे उपोषण सुरू केले आहे. तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धती लागू करण्याच्या मागणीसाठी नितीन आंधळे, अरविंद वळेकर, मनोज पिंगळे आदींनी शास्त्री रस्त्यावर समांतर आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आता वर्णनात्मक परीक्षा पद्धती कायम ठेवण्याच्या मागणीसाठी स्वतंत्र आंदोलन सुरू करण्यात आले.

वर्णनात्मक पद्धतीसाठी स्वतंत्र आंदोलनकाही स्पर्धा परीक्षार्थ्यांनी एकत्र येऊन वर्णनात्मक परीक्षा पद्धती कायम ठेवणे, आयोगाची स्वायत्तता कायम राखली जाण्यासाठी स्वतंत्र आंदोलन सुरू केले. टिळक चौक येथे हे आंदोलन करण्यात येत आहे. ‘गेल्या तीन वर्षांपासून उमेदवार वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची तयारी करत आहेत. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धती पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर वर्णनात्मक पद्धतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही स्वतंत्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. देशात सर्व लोकसेवा आयोगांमध्ये वर्णनात्मक परीक्षा पद्धतीच आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत बंद करून वर्णनात्मक परीक्षा पद्धती लागू करण्यात आली आहे. आता पुन्हा जुन्या पद्धतीकडे जाणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. आयोगाची स्वायत्तता राखली गेली पाहिजे. यूपीएससीमध्ये महाराष्ट्र मागे पडतो म्हणून वर्णनात्मक परीक्षा पद्धत लागू करण्यात आली. ही पद्धत कायम राहिली पाहिजे,’ असे आंदोलक चेतन वागज यांनी सांगितले.