पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा देण्यात आलेला पर्याय (ऑप्टिंग आऊट) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पर्यायाचा गैरवापर झाल्यामुळे पर्यायच बंद करण्याची वेळ आली. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी या निर्णयाबाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली.
एमपीएससीने पदभरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) २०२२-२३च्या सुमारास लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पर्यायाद्वारे पदभरती निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याचा मूळ उद्देश होता. मात्र, या पर्यायाचा उमेदवारांकडून गैरवापर केला जात असल्याच्या, आर्थिक व्यवहार केले जात असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर, आता हा पर्यायच बंद केला जाणार आहे.
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ऑप्टिंग आऊट ही संकल्पना लागू केली. या प्रक्रियेद्वारे तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येतो. आयोगाने बुधवारी या संदर्भात बैठक घेऊन या पर्यायासंदर्भात चर्चा केली.
तसेच आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांकरीता भरती प्रकियेतून बाहेर पडणे हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी भरती प्रकियेतून बाहेर पडणे, संमती विकल्प देणे हा पर्याय रद्द करण्यात येत आहे. हा निर्णय बुधवारपासूनच लागू करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एकल संवर्गाच्या भरतीप्रक्रियेसाठी प्रतीक्षायादी कार्यान्वित राहील. बहुसंवर्गीय पदांच्या भरतीप्रकियेसाठी प्रतिक्षायादी राहणार नाही. बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवार ज्या पदावर अगोदरच नियुक्त झाला असेल, अशा पदाचा अथवा निम्न पदाच्या संबंधित उमेदवाराने पसंतीक्रम दिल्यास त्याचा त्या पदासाठी किंवा निम्न पदावरील शिफारसीसाठी विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षांच्या निवड प्रक्रियेत अधिकाधिक उमेदवारांना निवडीची संधी मिळावी, पदे रिक्त राहू नयेत या उद्देशाने एमपीएससीने ऑप्टिंग आऊटचा पर्याय लागू केला होता. हा पर्याय लागू करण्यामागील विचार खूप चांगला होता. मात्र, त्याचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे हा चांगला पर्याय बंद करण्याची वेळ आली. महेश बडे, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन
