पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तीन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात ३ ऑक्टोबर, २०२६ पासून घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-२०२६ या स्पर्धा परीक्षांचा समावेश असून, परीक्षेच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी संघटना, विद्यार्थी यांनी आयोगाकडे आक्षेप नोंदविलेले आहेत. संबंधित आक्षेप विचारात घेऊन राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५च्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे या परीक्षेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.
राज्यातील राज्यातील प्रचलित सर्व परीक्षा पद्धर्तीचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. राज्यभरातील अनेक परीक्षार्थी व इतर संबंधितांशी विस्तृत चर्चा करून, तसेच उत्तम कार्यपद्धतींचा अभ्यास करून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत समितीच्या शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना, काही लोकप्रतिनिधी यांच्याकडून ३ ऑक्टोबरपासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२६ पुढे ढकलण्याची निवेदने आयोगास प्राप्त झालेली आहेत. या संदर्भात सर्व बाबींचा आयोगाने साकल्याने विचार करून ३ ऑक्टोबर, २०२६ पासून घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-२०२६ या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षांचा मुद्दा चर्चेत आहे. एमपीएससीवर करण्यात आलेल्या पेपरफुटीचे आरोपांबाबत पोलिस तपास सुरू आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षार्थी, राजकीय पक्षांची आंदोलनेही झाली आहेत. तसेच आयोगाने गट-क पूर्व परीक्षा जानेवारी २०२७ पर्यंत लांबणीवर टाकली आहे.
