पुणे : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सरकार आणि मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद साधण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवारांसारखा अनुभवी नेता अशी समंजस भूमिका घेत असेल, तर त्यांच्या विचारांवर चालणाऱ्यांनीही उगाच हट्ट न धरता विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे,’ अशा शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आमदार रोहित पवारांना चिमटे काढले.
‘एमपीएससी’मधील सुधारणांसाठी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या अहिल्या अभ्यासिकेसमोरील दुसऱ्या आंदोलनाला नितेश राणे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राणे म्हणाले, ‘रोहित पवार माझे चांगले मित्र आहेत, ते राजकीय शत्रू नाहीत. उद्या कदाचित तेही आमच्याबरोबर सरकारमध्ये मंत्री असतील. ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे भानही त्यांनी ठेवले पाहिजे.’
‘मी येथे आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील एक मित्र म्हणून आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक आहेत. त्यामुळे कोणीही या आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये,’ असेही राणे म्हणाले.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी सुमारे पावणेतीन तास चर्चा केली. त्यातून सकारात्मक तोडगाही काढण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या १३ पैकी १२ मागण्या मार्गी लागल्या आहेत. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणारे आहोत. घटनात्मक पदांवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत नियमांनुसारच प्रक्रिया राबवावी लागते. सरकारने आधीच सचिवांची विकेट काढली असून, उर्वरित प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल,’ असेही राणे यांनी सांगितले.
‘परीक्षा बहुपर्यायीच’
‘राज्यातील ९९ टक्के विद्यार्थ्यांची मागणी बहूपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) पद्धतीनेच परीक्षा घेण्याची आहे. राज्य शासनाने स्थापन केलेली व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यभरातील विद्यार्थ्यांची मते जाणून घेत आहे. या समितीत माझ्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी हे सदस्य आहेत. या समितीचा अहवाल अत्यंत पारदर्शक असेल. राज्य शासन विद्यार्थ्यांच्या मनासारखाच निर्णय घेईल,’ असा दावाही राणे यांनी केला.
