पुणे : ‘लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत. पेपर फुटताय, नोकरभरतीमध्ये भ्रष्टाचार आहे. आपल्या टोळ्यांमधली माणसं प्रशासनात घुसवायची आणि राज्य ताब्यात घ्यायचे. ते माफियांच्या हातात न्यायचे, अशा प्रकारचे ‘व्हाईट कॉलर’ माफिया राज्यात सरकारच्या माध्यमातून सक्रिय आहेत,’ अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष (एमपीएससी) विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला राऊत यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राज्यातील तरुणांची डोकी खराब करून, त्यांना शिक्षणापासून, विचारांपासून आणि संविधानापासून दूर करून अंधभक्त बनवण्याचा कारखाना या सरकारने चालवलेला आहे. हा अंधभक्तांचा कारखाना देशविरोधी काम करण्यासाठी सुरू केला आहे. राज्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातील लढणाऱ्यांची, स्वाभिमानी पिढी पूर्णपणे नष्ट करायची आहे. महाराष्ट्रातील बहुजन समाजातल्या सगळ्या दलित शोषित वर्गातल्या मुलांना, त्यांना मुख्य प्रवाहात येऊ द्यायचं नाही.’
‘गेल्या दहा वर्षांमध्ये हे राज्य अत्यंत वाईट प्रकारे घडताना पाहिले आहे. पक्षांमध्ये फूट पाडायची. त्याच प्रकारे आता या आंदोलनामध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. हे महाराष्ट्राच्या एका पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आंदोलन आहे. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. जाती-जातींमध्ये, धर्माच्या नावाखाली. भविष्यात भौगोलिकदृष्ट्याही राज्याचे दोन तुकडे पाडायचे आहेत. त्यासाठीची यंत्रणा राबवण्यात येत आहे. पण, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आणि शरद पवारांचा आहे. हा महाराष्ट्र शरण जाणार नाही,’ असेही राऊत म्हणाले.
‘एक राऊत, सौ दाऊद’
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या भाषणाआधी विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक विद्यार्थ्यांनी ‘एक राऊत, सौ दाऊदी…’ ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला…’ अशा घोषणा देत राऊत यांचे स्वागत केले. या वेळी आमदार रोहित पवार यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आल्याबद्दल राऊत यांचे आभार मानले. तसेच राऊत यांनी या आंदोलनात शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरेही सहभागी होणार असल्याचे सांगितले. सध्या प्रकृतीअस्वस्थ्यामुळे आदीत्य ठाकरेंना आंदोलनात हजर राहता आले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
