पुणे : ‘विधिमंडळ, कायदेमंडळ आणि प्रशासन या चाकांवर लोकशाही चालते. सत्तर वर्षे हे गुण्यागोविंदाने सुरू होते. राज्याच्या विकासात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वाटा लोकप्रतिनिधींइतकाच महत्वाचा असतो. त्यासाठी प्रशासनाने शुद्धतेने, सचोटीने काम केले पाहिजे. आज मात्र प्रशासनावरच साशंकतेचे ढग दाटलेले दिसतात,’ अशी टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी रविवारी केली.
विद्यार्थ्यांचा विरोध असतानाही सरकारकडून ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’चा (सीबीटी) आग्रह का करण्यात येत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाटील यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, शिवराज मोरे या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले,‘राज्याच्या विकासात प्रशासनाचा मोठा वाटा आहे. एमपीएससीच्या माध्यमातून राज्यसेवेचे स्वप्न पाहणारी तरुण पिढी उद्याच्या महाराष्ट्राचे भवितव्य घडवणार आहे. मात्र, याच विद्यार्थ्यांना आज न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. एमपीएससीची परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे.’
‘सत्तेची मस्ती यांच्या डोक्यात घुसली आहे. सत्ताधाऱ्यांना चोरी करायची सवय झाली आहे. मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ आहे. शेतात दाणा नाही. बाप १५ हजार हातात देऊ शकत नाही, मेसचे पैसे पाठवू शकत नाही. शेतकरी, त्याचे कुटुंब हैराण आहे. इथे बसलेल्यांपैकी ५० टक्के तिशीच्या वर गेलेत. ही पोरं पाच-सहा वर्षं घालवून अभ्यास करतात. एका रूममध्ये सहा-सहा जण राहतात. आता या सरकारचे बारा वाजल्याशिवाय उठू नका,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
