पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. पुण्यासह मुंबई आणि राज्यातील अन्य भागांतही त्याचे पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सरकार आणि संबंधित शिक्षण संस्थांनी नोंद घेऊन त्यातून मार्ग काढावा. या प्रश्नाचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न चर्चेतून सुटून त्यावर मार्ग निघाला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचेही पवार यांनी सांगितले.
एमपीएससीच्या विविध परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
‘‘गेल्या काही दिवसांपासून आंदोलनात असोत किंवा नसोत, अनेक विद्यार्थी अस्वस्थ आहेत. या संदर्भात काही विद्यार्थी मला भेटले असून, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. या प्रश्नाचे महत्त्व लक्षात घेऊन सुसंवाद झाला पाहिजे. मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली पाहिजे. चर्चेने प्रश्न सुटतात,’’ असे पवार म्हणाले.
‘‘मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी केला होता. मात्र, ते सध्या मुंबईत नाहीत. ते मुंबईत आल्यानंतर या प्रश्नात लक्ष घालून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी विनंती त्यांना केली आहे,’’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
‘चुकीच्या गोष्टींविरोधात सोबत’
दरम्यान, मुंबईत विशेष मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या संदर्भात ठाकरे बंधूंनी रविवारी काढलेल्या मोर्चाबाबतही पवार यांनी भाष्य केले. ‘‘या प्रकरणात विविध राजकीय मंडळी पुढे येत आहेत. चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आम्ही सोबत राहणार आहोत,’’ असे पवार यांनी सांगितले.
