पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करून त्यात बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली असून, समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
विविध स्पर्धा परीक्षांसाठी सध्याच्या अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ मे रोजीच्या पत्राद्वारे राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनकडे (मित्र) या संस्थेकडे केली होती. बदलत्या शैक्षणिक आणि व्यावहारिक गरजांच्या अनुषंगाने अभ्यासक्रम अद्ययावत करणे आवश्यक असल्याने मित्र संस्थेचे अध्यक्ष यांच्या निर्देशांनुसार अभ्यासक्रम पुनरावलोकन, सुधारित अभ्यासक्रमासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मित्र संस्थेचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट अ, गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) आणि गट क सेवा परीक्षांच्या सध्याच्या अभ्यासक्रमांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करणे, संबंधित विभाग आणि संबंधित विषयांतील तज्ज्ञांशी विचारविनिमय करणे, अभ्यासक्रमातील कालबाह्य विषय बदलून नवीन तांत्रिक, प्रशासकीय, समकालीन घडामोडींशी संबंधित विषयांचा समावेश सुचवणे, सुधारित अभ्यासक्रमासह शिफारशींचा सविस्तर अहवाल तयार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.
समिती आवश्यकतेनुसार संबंधित विषयांतील तज्ज्ञ, शासकीय अधिकारी यांना समितीच्या बैठकीस आमंत्रित करू शकेल, समिती आपला अंतिम अहवाल तीन महिन्यांत सादर करेल. समितीला अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक असल्यास मित्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने मुदतवाढ देता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तज्ज्ञ समितीमध्ये कोणाचा समावेश?
अभ्यासक्रम पुनरावलोकन आणि सुधारणा समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये माजी मुख्य सचिव डी. के. जैन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, लाभक्षेत्र विकास संस्थेचे सचिव संजय बेलसरे, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, मित्र संस्थेचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
