MPSC Group C Mains Result 2024 Declared: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४ मधील लिपिक-टंकलेखक’ या संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्या आधारे पात्र उमेदवारांना १४ ते २० एप्रिल या कालावधीत पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार सोहेल नौशाद शेडबाले यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. अण्णासाहेब उत्तम खाडे यांनी द्वितीय, प्रसाद चंद्रकांत पवार यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो, पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो. या संवर्गाच्या अधिसूचित नियुक्ती प्राधिकारीनिहाय कार्यालयांना पसंतीक्रम विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर पोस्ट प्रेफरन्स, ऑप्टिंग आऊट हा दुवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा दुवा १४ ते २० एप्रिल या कालावधीत सुरू राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवारांकडून प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल, शिफारशीसंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी दिलेल्या कालावधीत नियुक्ती प्राधिकारीनिहाय पुन्हा पसंतीक्रम सादर करणे आवश्यक राहील, पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या नियुक्ती प्राधिकारीसाठी ऑनलाइन पसंतीक्रम सादर करतील, केवळ त्याच नियुक्ती प्राधिकारीसाठी त्यांचा विचार करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत पसंतीक्रम सादर न केल्यास त्यांनी मुख्य परीक्षेस अर्ज करताना दिलेला पसंतीक्रम गृहीत धरण्यात येईल. उमेदवारांनी त्यांना ऑनलाइन दुव्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकारींसाठी पसंतीक्रम अथवा प्राधान्य नाही असा विकल्प निवडणे अनिवार्य आहे.

पसंतीक्रम सादर केल्यानंतर पीडीएफ डाऊनलोड करून उमेदवारांना पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील. मुदतीनंतर नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.