पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भीमनवार यांनी पदभार स्वीकारेपर्यंत अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार एमपीएससीचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही घटनादत्त स्वायत्त संस्था आहे. राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्यात येते. माजी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ संपला असल्याने एमपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता आता विवेक भीमनवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सध्या परिवहन आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या भीमनवार यांनी या या पूर्वी फिल्मसिटीचे संचालक, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, विवेक भीमनवार यांची अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्ती त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सहा वर्षांसाठी किंवा त्यांच्या वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील. भीमनवार अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात करेपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवे सचिव, नवे अध्यक्ष

गेल्या काही काळापासून रिक्त असलेल्या सचिव पदावर नुकतीच महेंद्र हरपाळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता भीमनवार यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या लागोपाठच्या नियुक्त्यांमुळे एमपीएससीला नवे सचिव, नवे अध्यक्ष मिळाले आहेत.