Pune MPSC Protest: ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात येणार असून, आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची, तर सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,’ अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी केली. चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव असून, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि २०२७ मधील गट-क परीक्षेतील पदसंख्या दुप्पट करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी सायंकाळी उशिरा भेट देऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कायदा आणि राज्यघटनेच्या चौकटीत कार्यवाही केली जाईल,’ असे सांगून त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. या आयोगाचे कामकाज सुरू असेपर्यंत ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून दूर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली असून, आयोगाच्या अध्यक्षपदी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांची नियुक्ती केली आहे. सचिवपदी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह माजी न्यायाधीश पी. डी. नाईक, पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचा या समितीत समावेश आहे.’
‘‘एमपीएससी’च्या प्रश्नांसंदर्भात सरकार सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे. आपण ज्या-ज्या मागण्या वेळोवेळी केल्या, त्या मुख्यमंत्री साहेबांकडे मांडल्या आणि त्यातूनच हा प्रस्ताव मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे,’ असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
समितीच्या चौकशीची व्याप्ती केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित न ठेवता पेपरफुटी झालेल्या सर्व परीक्षांचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील पुरावे समितीसमोर सादर करता येणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, चौकशी निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे होण्यासाठी चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाच्या विद्यमान अध्यक्षांना पदावर ठेवू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी सरकारसमोर मांडली. सत्याग्रह आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि २०२७ मध्ये होणाऱ्या गट-क परीक्षेतील पदांची संख्या दुप्पट करणे, या मागण्यांचाही मसुद्यात समावेश आहे. समितीच्या स्थापनेचे स्वागत करतानाच या मागण्यांवरही सरकारने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राजकीय स्वार्थासाठी आंदोलन – खोत
‘विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, काही जण विद्यार्थ्यांचे प्रश्न पुढे करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत. ते तरुणांना भडकावून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. खोत यांनी लालबहादूर शास्त्री रस्त्यावर अहिल्या अभ्यासिकेजवळ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. ‘पैसा आणि समाजमाध्यमांचा वापर करून तरुणांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये भाव मिळावा आणि राज्यातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी आंदोलन करावे,’ असेही खोत म्हणाले.
