पुणे : राज्यात स्पर्धा परीक्षार्थ्यांना आंदोलन करावे लागणे ही नामुष्की आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास करावा अशी व्यवस्था राज्य शासनाने केली पाहिजे. मात्र, भावी अधिकाऱ्यांना आंदोलन करावे लागणे ही विदारक परिस्थिती आहे, अशी खरमरीत टीका माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केली.
एस. एम. जोशी पूल येथे सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या उपोषण स्थळी झगडे यांनी स्पर्धा परीक्षार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विश्वजित पवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कवी नितीन चंदनशिवे यांनी पाठिंबा दिला.
झगडे म्हणाले, मीही प्रशासनात ३५ वर्षे काम केले आहे. मात्र, आतून कोणीतरी ठरवल्याशिवाय पेपर फुटू शकत नाही. त्यामुळे राज्य शासन आणि आयोग कमी पडत आहे. स्पर्धा परीक्षार्थ्यांना आंदोलन करावे लागते म्हणजे काहीतरी चुकीचे चालले आहे याचा विचार राज्याने केला पाहिजे. पुन्हा आंदोलनाची वेळ येणार नाही अशी व्यवस्था तयार झाली पाहिजे.
राजकीय नेते आणि स्पर्धा परीक्षार्थी आता वेगळे नाहीत. कारण एमपीएससी उमेदवारांचे पेपर फुटतात, तसे राजकारणात आमदार फुटतात, मतदारयाद्या साफ केल्या जातात, परीक्षांप्रमाणे निवडणुका ‘मॅनेज’ केल्या जातात. त्यामुळे सचिवांची बदली करून चूक मान्य करण्यात आले. आता एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे,’ असे सपकाळ यांनी सांगितले.
कायदेशीरदृष्ट्या एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेता येत नसेल, तरी नैतिकता आहे की नाही? खरेतर सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. या सरकारचा हेतू शुद्ध नाही. हे आंदोलन नवी दिशा देणारे आहे, असे थोरात यांनी नमूद केले. देशातील लोकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांना घालवले आहे, तर एमपीएससी आणि सत्ताधारी पक्ष ही काय चीज आहे… आतापर्यंत काही मागण्या मान्य झाल्या, काही मागण्या बाकी आहेत. एमपीएससीची व्यवस्था पारदर्शक झालीच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेच्या जोरावरच झाली पाहिजे, अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली.
