पुणे : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने (एमपीएससी) घेतलेल्या औषध निरीक्षक पदभरतीचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयाेगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अन्यथा विद्यार्थ्यांसह १ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेतलेल्या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करून त्या बाबतचा अहवाल ‘एमपीएससी’ला सादर केला. त्यात पेपरफुटी झाल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आल्याने ‘एमपीएससी’ने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पवार यांनी पुण्यातील नवी पेठ येथे स्पर्धा परीक्षार्थ्यांशी संवाद साधला. सुनील भुसारा, विकास लवांडे, पंकज नाना बाराडे, रविकांत वरपे, प्रमोद पाटील, ऋषीकेश गांगुर्डे, नीतेश सूर्यवंशी, ॲड. संकेत बारसकर, महादेव मुंडे या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपरफुटीत तीन अधिकारी सहभागी असल्याचे कळते आहे. या प्रकरणाला जबाबदार खासगी क्लासचालक गुजरातला जाऊन बसले असून, त्यांच्यावरही ‘एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. फुटलेला पेपर केवळ एकाच विद्यार्थ्याला मिळाला, हा ‘एमपीएससी’चा निष्कर्ष मान्य नाही, तर हे मोठे ‘रॅकेट’ असून, या बाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे. ‘सीईटी’मधील गैरव्यवहार थांबवा, आदिवासी विद्यार्थ्यांना पाठिंबा द्या, राजकारणातील सह्याद्री विद्यार्थ्यांसोबत आहे, तेव्हा काळजी करू नका,’ असे आश्वासनही पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले.
दरम्यान, ‘महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनेही ‘एमपीएससी’चे अध्यक्ष, सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या गंभीर अपयशाची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. अध्यक्ष आणि सचिवांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. भविष्यात पेपरफुटीच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ‘एमपीएससी’, राज्य सरकार कायमस्वरूपी कोणत्या ठोस उपाययोजना करणार, परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची जबाबदारी कोणाची असेल, ती जबाबदारी निश्चित कशी केली जाणार, याचे स्पष्ट उत्तर सरकारने द्यावे,’ असे युवक काँग्रेसचे प्रसारमाध्यम विभाग अध्यक्ष अक्षय जैन यांनी सांगितले. या प्रकरणी ‘काहीही झालेले नाही’ असा दावा केलेल्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
