पुणे : नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलावरील एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी विद्यार्थी प्रतिनिधींसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एमपीएसएसी आंदोलनाशी संबंधित दाखल करण्यात आलेला हा दुसरा गुन्हा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून नवी पेठेतील एस. एम. जोशी पूल परिसरात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती दिल्यानंतरही नवी पेठेतील लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावर बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी शुक्रवारी (९ ऑक्टोबर) एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शनिवारी (१० ऑक्टोबर) विनापरवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत हवालदार युवराज टोळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दिगंबर भारत खारे, प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गागुर्डे, अक्षय कांबळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार टोळे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एस. एम. जोशी पूल परिसरात तैनात होते. त्या वेळी आंदोलनस्थळी ड्रोन उडताना दिसला. टोळे यांनी शोध घेतला असता, आंदोलनाच्या मागील बाजूस दिगंबर खारे दूरसंवेदकाच्या (रिमोट कंट्रोल) साहाय्याने ड्रोन चालवत असल्याचे आढळले. त्यानंतर खारे यांच्याकडे ड्रोन उडवून चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक परवानगी, तसेच स्थानिक पोलिसांची परवानगी आहे का, अशी विचारणा करण्यात आली. तसा कोणताही परवाना वा पोलिसांची परवानगी नसल्याचे त्याने सांगितले. अधिक चौकशी केली असता, आंदोलनात सहभागी प्रमोद पाटील आणि इतरांच्या सांगण्यावरून ड्रोन आणल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी ड्रोन जप्त केला असून, विश्रामबाग पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
‘माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा’
‘लोकप्रतिनिधी म्हणून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालो. पोलीस माझ्याऐवजी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. सरकारचे ऐकून पोलीस विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे, नोटीस बजावणे असे प्रकार करीत आहेत. केवळ आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून हा त्रास दिला जात आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. आंदोलनाला परवानगी मिळण्याबाबत अर्ज सादर केले आहेत,’ असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
