पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराचे पुरावे विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिल्यामुळेच विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी शुक्रवारी केला. न्यायासाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे नोंदवून फरक पडणार नाही. ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.

पोलिसांच्या परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी १५ आंदोलक परीक्षार्थ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषेदत आंदोलकांनी भूमिका मांडली. पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’मध्ये आधीच दुसऱ्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या एकाचे नाव जाणीवपूर्वक गोवले आहे. संयुक्त परीक्षेतील घोटाळ्याबाबत १०० पैकी ९० गुण मिळाल्याचे पुरावे नुकतेच उघड करून ‘एसआयटी’ला दिले आहेत. हा घोटाळा लपवण्यासाठीच कारवाई सुरू आहे. आंदोलनाला पोलिसांची रीतसर परवानगी होती, न्यायालयानेही विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतलेली आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलन तीव्र केले जाईल, असे ॲड. डॉ. अजित काकडे यांनी सांगितले.

‘आंदोलनावेळी मी पुण्यात किंवा जिल्ह्यातही नव्हतो. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचा मूळ तक्रारदार असून, ‘एसआयटी’ला दिलेले पुरावे नुकतेच विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठीच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा हा प्रकार म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्यासारखे आहे. मात्र, कोणत्याही दबावाला किंवा खोट्या गुन्ह्यांना विद्यार्थी अजिबात घाबरणार नाहीत,’ असे ऋषिकेश गांगुर्डेने सांगितले.

दरम्यान, ‘पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांतील काही तरतुदी हास्यास्पद आहेत. या लढ्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले, तरी न्यायालयीन लढ्याचा सर्व खर्च मी उचलेन,’ असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी स्पष्ट केले.

‘एमपीएससी अध्यक्षांना घरी पाठवा’

‘साधी शिष्यवृत्तीची परीक्षाही सरकारला नीट घेता येत नाही, हे दुर्दैव आहे. सर्वसामान्यांच्या व्यथा सरकारला समजत नाहीत. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन व्यापक करून प्रत्येक जिल्ह्यात न्यावे लागेल. सरकारची दलाली करणाऱ्या एमपीएससी अध्यक्षांना घरी पाठवले पाहिजे,’ अशी भूमिका शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मांडली. एस. एम. जोशी पूल येथे सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली. माजी आमदार जयदेव गायकवाड, जयश्री थोरात अशा मान्यवरांनीही पाठिंबा दर्शवला.

आंदोलकांवर पोलिसांची नजर

आंदोलनावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. आंदोलनस्थळी आतापर्यंत सात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे आंदोलकांना सूचना दिल्या जात आहेत. आंदोलनाचे चित्रीकरण करण्यात येत असून, त्याद्वारे संबंधितांची ओळख पटवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.