जुन्नर : ‘पुण्यात एमपीएससी आणि नीट परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात विद्यार्थी आंदालन करत आहेत. त्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरून हटवून प्रश्न सुटणार नाही, त्यांच्या मागण्यांमागे तीव्र जनभावना आहेत. त्याऐवजी सरकारने विद्यार्थ्यांशी तत्काळ संवाद साधून सन्मानकारक मार्ग काढावा,’ अशी भूमिका शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडली.

नारायणगाव येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मतदार यादीतील कथित घोळ, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि पक्षातील फुटीच्या मुद्द्यांवरून केंद्र, राज्य सरकारवर टीका केली. खासदार राऊत म्हणाले. ‘निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय असंवैधानिक असून जनतेमध्ये याबाबत मोठा रोष आहे. आगामी निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या तर भाजपचा पराभव अटळ आहे. शिवसेना (ठाकरे) पक्ष हीच खरी शिवसेना आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असून, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जात आहेत. मतदारांचा विश्वास टिकवून ठेवणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ५० खासदारांच्या स्वाक्षऱ्यांसह महाभियोगाचा प्रस्ताव दिला होता, परंतु राज्यसभेच्या सभापतींनी तो फेटाळला. या भूमिकेमुळे आगामी संसदीय अधिवेशनाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.’

‘राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केवळ दिल्ली दौऱ्यांमध्ये व्यग्र आहेत. शेतकऱ्यांचे संकट, पाणीटंचाई यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.’ अशी टीका त्यांनी केली.

संपर्कप्रमुखपदी किरण तावडे

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी किरण तावडे यांच्या नियुक्तीची घोषणा खासदार राऊत यांनी केली. या वेळी पक्षाचे उपनेते संजय सावंत, बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख दिलीप बाम्हणे, दिपमाला बढे, सुरेश भोर, तालुकाप्रमुख भास्कर गाडगे, ॲड. जयराम तांबे, दिलीप डुंबरे, आनंद रासकर, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.