पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात उपोषण सुरू केले. ‘स्पर्धा परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय असून, सरकारने विद्यार्थ्यांना ‘लॉलिपॉप’ देऊ नये,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. दुसरीकडे, बहुपर्यायी परीक्षा पद्धती लागू करण्याच्या मागणीसाठी शास्त्री रस्त्यावर समांतर आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला सत्ताधारी पक्षातील आमदारांनी भेट दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी नुकतीच चर्चा केली. पेपरफुटीसंदर्भात आयोगाचे अध्यक्ष, सचिव, इतरांची न्यायालयीन चौकशी, तसेच सुमारे ७० हजार जागा भरण्यासह आगामी ३ वर्षांच्या रिक्त जागा आधीच जाहीर करून १ महिन्यात त्याचा संपूर्ण कार्यक्रम आखणे, सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, परीक्षा पद्धतीत कोणताही बदल करताना सर्व विद्यार्थी घटकांशी चर्चा करूनच निर्णय घेणे, सर्व परीक्षा देता येण्यासाठी माफक दरात सिंगल कार्ड सिस्टीम, एमपीएससी सचिवांची तत्काळ बदली अशा मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. त्यानंतर २ ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र, एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करून आमदार पवार यांनी नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ उपोषण सुरू केले. ‘सरकार विविध माध्यमातून चर्चा करत आहे. चर्चा करायला विद्यार्थी तयार आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने विद्यार्थी शिष्टमंडळाला दिली. पण, एमपीएससी अध्यक्षांना हटविण्याचे पत्र राज्यपालांना गेलेले नाही. अध्यक्षांनी राज्यपालांकडे राजीनामा द्यावा. दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने संघर्षाला पर्याय नाही,’ असे ते म्हणाले.

‘पावसाअभावी पिके गमावली आहेत. शेतकरीही अडचणीत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे पालक कसेबसे पैसे पाठवतात. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे,’ असे पवार यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आंदोलनाला भेट दिली. ‘मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांशी खुली आणि समोरासमोर चर्चा करावी,’ असे सुळे यांनी नमूद केले.

दरम्यान, बहुपर्यायी परीक्षा पद्धती लागू करण्याच्या मागणीसाठी नितीन आंधळे, अरविंद वळेकर, मनोज पिंगळे आदींनी शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार धनंजय मुंडे, भूषणसिंह राजे होळकर यांनी या आंदोलनाला भेट दिली. ‘वर्णनात्मक परीक्षा पद्धतीतील त्रुटी स्पष्ट झाल्या असल्याने बहुपर्यायी पद्धती लागू करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे,’ असे आंधळे यांनी सांगितले.