MPSC Update / पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जासोबत द्याव्या लागणाऱ्या प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी आता डिजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत एमपीएससीच्या प्रचलित पद्धतीला पर्यायी व्यवस्था म्हणून डिजिलॉकर प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डिजिलॉकर प्रणालीच्या स्वीकारामुळे उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. एमपीएससीच्या पदभरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जास विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे अपलोड करावी लागतात. या कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची छाननी, तपासणी करून उमेदवारांची पात्रता निश्चित केली जाते. आता या कार्यपद्धतीला पर्यायी व्यवस्था म्हणून डिजिलॉकरचा वापर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, एमपीएससीने उमेदवारांना कराव्या लागणाऱ्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डिजिलॉकर प्रणालीवर खाते असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या खात्यामधून उपलब्ध होणाऱ्या डिजिलॉकर ‘मेरी पेहचान’ संकेतस्थळावर लॉगिन करुन डिजिलॉकर खात्याची संमती. जेणेकरुन ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील खात्याशी डिजिलॉकर खाते संलग्न होऊ शकेल. डिजिलॉकर प्रणालीवर खाते नसलेल्या उमेदवारांनी https://www.digilocker.gov.in/ या संकेतस्थळावरआधार क्रमांक किंवा आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक यांचा वापर करुन नवीन खाते उघडून ते खाते ऑनलाइन अर्ज प्रणालीशी जोडून घ्यावे.
डिजिलॉकर खात्यामध्ये लॉगिन केल्यानंतर ‘जारी केलेली कागदपत्रे’मध्ये (इश्यूड डॉक्युमेंट्स) प्राधिकरण, सरकारी विभाग, शैक्षणिक मंडळे, विद्यापीठे आणि इतर विश्वासार्ह संस्था यांच्याकडून जारी करण्यात आलेली आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, दहावी आणि बारावीची गुणपत्रके, प्रमाणपत्रे अशी कागदपत्रे उपलब्ध होतील. उपलब्ध नसलेली कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात उमेदवारांना अपलोड करता येतील, असे नमूद करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करताना प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर करण्याच्या टप्प्यावर उमेदवारांनी डिजिलॉकर प्रणालीद्वारे कागदपत्रांचा पर्याय निवडून त्यावरील संबंधित कागदपत्रे सामायिक (शेअर) करायची आहेत. कोणत्याही भरती प्रक्रियेकरीता अर्ज करण्यासाठी लॉगीन किंवा प्रमाणपत्र अपलोड या टप्प्यावर डिजिलॉकर खात्यातील प्रमाणपत्रे सामायिक करण्यासाठी संमती देणे आवश्यक राहील.
लॉगिनच्या टप्प्यावर एकदा दिलेली संमती तदनंतरच्या ३० दिवसांच्या कालावधीसाठी वैध असेल. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने डिजिलॉकर प्रणालीच्या वापरासंदर्भातील सूचना आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली.
भविष्यात केवळ डिजिलॉकरचाच वापर
आयोगाकडून आगामी काळात कोणत्याही भरती प्रक्रियेच्या अंतिम निकालाआधारे शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची शिफारसपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील खात्यासह डिजिलॉकर प्रणालीद्वारे वितरित करण्यात येतील. डिजिलॉकर प्रणालीद्वारे कागदपत्रे, प्रमाणपत्रे सादर करण्याची कार्यपद्धत सद्यस्थितीत वैकल्पिक असेल.
मात्र, डिजिलॉकर प्रणालीमधील जारी केलेल्या कागदपत्रांना माहिती तंत्रज्ञान नियम, २०१६ नुसार मूळ प्रमाणपत्राप्रमाणेच वैधता असल्यामुळे आगामी काळात कागदपत्रे, प्रमाणपत्रे केवळ डिजिलॉकर प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत, असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
