महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची परीक्षा एकाच दिवशी येत असून स्टेट बँकेच्या परीक्षेची तारीख बदलून मिळावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अडवणूक केली जात असल्याची उमेदवारांची तक्रार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहायक पदासाठीची परीक्षा येत्या रविवारी (१५ जून) होणार आहे. त्याच दिवशी स्टेट बँक ऑफ इंडियाचीही भरतीसाठीची परीक्षा होत आहे. या दोन्ही परीक्षा एकाच वेळी येत असल्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. आयोगाच्या परीक्षेची तारीख पूर्वीच जाहीर झाली होती. त्यानंतर बँकेच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही परीक्षांना बसलेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाने तारीख बदलून द्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाची परीक्षा महिना अखेरीसही होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी बँकेच्या परीक्षेची तारीख बदलून मागितली आहे. याबाबत काही उमेदवारांनी बँकेच्या संबंधित विभागाशी संपर्कही साधला होता. मात्र, बँकेकडून परीक्षेची तारीख बदलून दिली जात नसल्याची तक्रार उमेदवार करत आहेत.