दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा लांबणीवर; उत्तरतालिकेवर आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांना दिलासा

संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ गट बच्या उत्तरतालिकेवर आक्षेप घेऊन ८६ उमेदवारांनी मॅट आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

उत्तरतालिकेवर आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांना दिलासा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१च्या अंतिम उत्तरतालिकेवर आक्षेप घेऊन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) दाद मागितलेल्या उमेदवारांना न्यायाधिकरणाने दिलासा देत अंतिम परीक्षेसाठी प्रवेश देण्याचे आदेश एमपीएससीला दिले. त्यामुळे एमपीएससीने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ पुढे ढकलली आहे.

  या परीक्षेसाठी पूर्व नियोजित उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार असल्याने छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे शक्य नसल्याने २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, या संदर्भात अंतिम निर्णय येईपर्यंत परीक्षा आयोजनासंदर्भातील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात आल्या आहेत.

संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ गट बच्या उत्तरतालिकेवर आक्षेप घेऊन ८६ उमेदवारांनी मॅट आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या संदर्भात न्यायालयाने ८६ उमेदवारांना अंतिम परीक्षेला प्रवेश देण्याचा आदेश दिला. त्यानुसार एमपीएससीकडून संबंधित उमेदवारांना अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली. मात्र ८६ उमेदवारांव्यतिरिक्त अन्य काही उमेदवारांनी मॅटमध्ये दाद मागितल्याने संबंधित उमेदवारांना मॅटने दिलासा देत अंतिम परीक्षेसाठी प्रवेश देण्याचा आदेश दिला. या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

कोणत्याही परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांच्या मर्यादेच्या संख्येत आयोगाकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांची छपाई करण्यात येते. ऐन वेळी कोणत्याही कारणाने प्रवेश द्यायच्या संख्येत अल्प प्रमाणात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेण्यात येते. मात्र महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ परीक्षेच्या अनुषंगाने विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे, अन्य बाबींची पूर्तता अल्प कालावधीत करणे शक्य नसून २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेच्या  अंतिम उत्तरतालिकेसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाखल मूळ अर्जाच्या अनुषंगाने न्यायाधिकरणाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊन परीक्षेचे सुधारित दिनांक जाहीर करण्यात येतील, असे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

एमपीएससीने चौथी उत्तरतालिका प्रसिद्ध करून त्यानुसार निकालात बदल करून अंतिम परीक्षा घेतली जाणे आवश्यक आहे, असे तुकाराम हिरवे या उमेदवाराने सांगितले. तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब २०२१मधील उमेदवारांबाबत एमपीएससीने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. न्यायालयात जाऊ न शकलेल्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये, असे युवा सेनेचे सचिव कल्पेश यादव म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpsc secondary service non gazetted group b main examination prolongation consolation candidates object answer sheet akp

Next Story
पुणे : ‘भाई’ न म्हटल्याने सराईत गुंडांची तरुणाला अमानुष मारहाण; खायला लावली जमिनीवरची बिस्कीटं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी