पुणे : आमच्या घरातल्या आत्या, काकू, मावशी एकाही नातेवाईकाला भाजपचं बटण दाबू देणार नाही… या सरकारमुळे हजोरो विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले… अशा शब्दांत एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केला. कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी स्पर्धा-परीक्षांच्या तयारीसाठीचा संघर्ष आणि त्यानंतरही पेपरफूटी, आयोगाच्या कारभारामुळे होणाऱ्या नुकसानाचे गाऱ्हाणे मांडले. तर ‘सरकारच्या बुद्धीला गंज चढलाच आहे. पण, नागरिकांची बुद्धीही गंजलेलीच दिसते,’ अशी टीका दिपके यांनी केली.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिपके यांनी भेट दिली. या वेळी उपस्थित आंदोलकांशी दिपके यांनी संवाद साधत विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
‘आंदोलनात मुलींची संख्या कमी आहे. मुलांप्रमाणे जास्त वयापर्यंत मुली अभ्यास करू शकत नाहीत. घरातून लग्नासाठी दबाव असतो. इतरही प्रश्न असतात. त्यात पेपरफूटीसारख्या घटनांमुळे आणखी अन्याय होतो. या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या या प्रश्नाकडे सकारात्मकपणे बघावे; नाही तर इथे आलेली एकही मुलगी भाजपला मतदान करणार नाही. आमच्या घरातल्या आत्या, काकू, मावशा एकाही नातेवाईकाला भाजपचे बटण दाबू देणार नाही,’ अशा शब्दांत आंदोलक विद्यार्थिनीने आक्रोश व्यक्त केला. यावर प्रतिसाद देताना दिपके म्हणाले,‘हे एकदम बरोबर आहे. इथे बसलेल्या अनेकांना आता नक्की काय सुरू आहे, हे कळत नाही. सत्ताधाऱ्यांनाही ते काय करतात हे समजत नाही. ते शिकलेलेच नाहीत.’
दिपके म्हणाले,‘काही लाख रुपये घेऊन हे पेपर फोडून लोकांना पास करतात. मग परीक्षाच कशाला घेता? आयपीएलमध्ये क्रिकेटर्सच्या बोल्या लावतात, तशा उमेदवारांच्याही बोल्या लावाव्यात. ते आमदारी फोडतानाही हेच करतात. एमपीएससीमध्येही तेच. पैसा फेकेल त्याला सीट. आता निवडणूकांही लिलावाप्रमाणे करा. सरकारी परीक्षाही बोली लावूनच घ्या. सरकारच्या बुद्धीला तर गंज चढलाच आहे. पण, देशाच्या नागरिकांची बुद्धीही गंजलेली दिसते.’
