पुणे: वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी हा मुलगा सब रजिस्ट्रार कसा होऊ शकतो? आणि हा राज्यात पहिला आला कसा? असे सवाल उपस्थित करत सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवर विनाकारण संशय घेतला जात आहे. सोशल मीडिया आणि टेलिग्रामच्या माध्यमातून काही घटकांकडून पद्धतशीरपणे अपप्रचार केला जात असून, यावर आता स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवलेले गुणवंत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. आमच्या मेहनतीवर आणि पात्रतेवर शंका घेणाऱ्यांनी पुराव्यासह समोर यावे, आम्ही प्रत्येक चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे आव्हान या विद्यार्थ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले. या परिषदेला राज्यातील ८४ दुय्यम निबंधक अधिकारी उपस्थित होते.

सातत्यपूर्ण अभ्यासाचे फलित; वय नव्हे तर गुणवत्ता महत्त्वाची

एम पी एस सी च्या विविध परीक्षांमध्ये अव्वल ठरलेले आणि सध्या सांगलीत उद्योग निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले निलेश सावंत यांनी यावर पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. मी यापूर्वी ASO २०२० परीक्षेत राज्यात पहिला आलो होतो, तसेच STI २०२१ आणि उद्योग निरीक्षक पदावरही माझी निवड झाली आहे. केंद्रीय आणि राज्यसेवेच्या मुलाखतींपर्यंत मजल मारली असून, अभ्यासाच्या सातत्यामुळेच मला मुख्य परीक्षेत ४०० पैकी ३१७ गुण मिळाले आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहणे हा काही गुन्हा नाही, असे सावंत यांनी सांगितले. तर दुसरीकडे, महाराष्ट्र राज्यपत्रित गट-ब परीक्षेतून दुय्यम निबंधक पदी निवड झालेले व राज्यात ११ वी रँक मिळवणारे संकेत डोभाल म्हणाले, वयाच्या २१ व्या वर्षी यश मिळवणे हा गुन्हा ठरू शकत नाही. आयोगाच्या सर्व निकषांची पूर्तता करूनच मी पात्रता सिद्ध केली आहे. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी अल्पवयात उच्च पदे भूषवली आहेत.

टेलिग्रामवरील झुंडशाही आणि पैशांचा खेळ

परीक्षा रद्द करण्यासाठी काही असमाधानकारक घटकांनी टेलिग्रामवर स्वतंत्र गट तयार करून विद्यार्थ्यांची दिशाभूल चालवली असल्याचा आरोप परिषदेत विद्यार्थ्यांनी केला आहे. फेक नॅरेटिव्ह पसरवून पुनर्परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू असून त्याचे सर्व स्क्रीनशॉट आमच्याकडे सुरक्षित आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत, जिथे प्रामाणिक आणि संशयित विद्यार्थी वेगळे करणे शक्य आहे, तिथे सरसकट सर्वांवर अन्याय करणे योग्य नाही.

एसआयटी चौकशीचे थेट आव्हान

आम्ही सर्व गुणवंत विद्यार्थी स्वतःहून एस आय टी चौकशीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. प्रशासनाने तातडीने चौकशी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा, परंतु निष्पाप आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना वेळेत नियुक्त्या द्याव्यात, अशी आग्रही मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.