पुणे : दीपस्तंभ फाउंडेशन-मनोबल प्रकल्पातील वैष्णवी भोसले या विद्यार्थिनीने एमपीएससी गट-ब संयुक्त परीक्षेत यश मिळवले. वैष्णवीची राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक या दोन्ही पदांसाठी निवड झाली. विशेष म्हणजे, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून राज्यातील मुलींमध्ये दोन्ही पदांसाठी प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी तिने केली.
मूळच्या धाराशिवच्या वैष्णवीने दीपस्तंभ फाउंडेशन-मनोबल प्रकल्पातील पुणे केंद्रातून स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेतले. वैष्णवीचे वडील रोजंदारी मजूर म्हणून काम करतात, तर आई आशासेविका म्हणून कार्यरत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन वैष्णवीने उल्लेखनीय यश मिळवले. याच परीक्षेत दीपस्तंभ फाउंडेशनच्या जळगाव प्रकल्पातील आशिष नागणे, हर्षला कुरले आणि आकांक्षा आडपोड यांचीही दुय्यम निबंधकपदी, तर नीलम गाढवे, सुजित पंडित, कांचन महाजन, अजय सोळंके, प्रसाद थोरवे, विशाखा रंगारी, वैजनाथ डुकरे आणि अमृता पानखंडे यांची राज्य कर निरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. अजय (अनाथ), आशिष (दिव्यांग) आणि वैजनाथ डुकरे (कर्णबाधित) यांनी मिळवलेले यश विशेष प्रेरणादायी ठरले आहे.
दीपस्तंभ-मनोबलचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन म्हणाले, ‘संधीची समानता आणि सर्वसमावेशक शिक्षण ही केवळ संकल्पना न राहता, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष संधी मिळणे गरजेचे आहे. परिस्थिती, सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असो, योग्य मार्गदर्शन व समान संधी मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेच्या बळावर यशाची उंची गाठू शकतो. दीपस्तंभ-मनोबलच्या विद्यार्थ्यांचे हे यश त्याच समावेशक शिक्षणाच्या विचाराचे सार्थक उदाहरण आहे.’
दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या वंचित, दिव्यांग, अनाथ आणि समाजातील विविध दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण, अभ्यासाचे पोषक वातावरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. दीपस्तंभ मनोबल प्रकल्पांतर्गत काम करणारी केंद्रे जळगाव, पुणे व नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. या संधीचा उपयोग करत विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत आपले स्थान निर्माण केले आहे.
