पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातून एमपीएससीशी संबंधित समस्या, स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या प्रश्नांची घुसळण झाली. पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती नियुक्त झाल्याने, समितीचे कामकाज होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर गेल्याने आता एमपीएससीच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. तडजोडीच्या माध्यमातून आंदोलनाचा शेवट गोड करण्यात आला.
एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक परीक्षेत पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले. त्यावरून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पुढाकार घेत स्पर्धा परीक्षार्थ्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडत पत्रकार परिषदा घेऊन एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच ३० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी वगळता बहुतांश मागण्या मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले होते. त्यात एमपीएससी अध्यक्षांची तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करणे, एमपीएससी सचिवांची बदली करणे, गट क परीक्षांसाठी जागा वाढवणे, तीन वर्षांच्या जागा एकदम जाहीर करणे, सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, १०० रुपयांच्या कार्डवर सर्व परीक्षा देता येणे अशा मागण्यांचा समावेश होता. मात्र, भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहून पुण्यातील एस. एम. जोशी पूल येथे २ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले. आमदार रोहित पवार, आमदार डॉ. विश्वजित कदम या आंदोलनात सक्रीय होते. एमपीएससीचे अध्यक्षपद हे घटनात्मक असल्याने त्यांचा राजीनामा घेता येत नाही, त्यासाठी रीतसर प्रक्रिया असल्याचे मुख्यमंत्र्यांसह वेगवेगळ्या मंत्र्यांनी स्पष्ट केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन सुरू होऊन १०-११ दिवसांनंतरही भीमनवार यांचा राजीनामा झाला नाही. त्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्याच्या दृष्टीने रविवारी हालचाली सुरू करण्यात आल्या. चौकशी समितीमध्ये सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह काही अधिकाऱ्यांची नावे सुचवण्यात आली. तसेच चौकशीच्या काळात भीमनवार यांनी त्यांच्या पदावर राहू नये, अशी मागणी करण्यात आली. या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. त्यामुळे समिती जाहीर झाल्यावर भीमनवार यांनी रविवारी रात्री उशीरा समाजमाध्यमांत पोस्ट करून सक्तीच्या रजेवर जात असल्याचे जाहीर केल्यावर आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. भीमनवार यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी मान्य झाली नसली, तरी राज्य सरकार आणि आंदोलकांनी एक-एक पाऊल मागे घेतल्याचे दिसून येते. तसेच या १०-१२ दिवसांमध्ये एमपीएससीशी संबंधित समस्या, स्पर्धा परीक्षार्थ्यांचे प्रश्न चर्चेत आले. आता न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून एमपीएससीचे शुद्धिकरण होणे अपेक्षित आहे. व्ही. राधा समितीच्या नेमक्या काय काय शिफारसी येतात, त्यावरही बरेच काही अवलंबून असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
अन्य दोन आंदोलनेही संपुष्टात
भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनातून आणखी दोन आंदोलनांचा जन्म झाला. त्यात एका गटाने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घ्यावी, तर दुसऱ्या गटाने वर्णनात्मक पद्धत कायम ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षांशी संबंधित तीन आंदोलने समांतरपणे सुरू राहिली. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धतीच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांनी पाठिंबा दिला. तर वर्णनात्मक पद्धतीसाठीचे आंदोलन तीन-चार दिवसांतच संपुष्टात आले. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासनानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.
