१९६७च्या कादंबरीची आजही भुरळ
गणेशोत्सवामध्ये प्रकाशित झालेल्या ‘मृत्युंजय’ या अलौकिक साहित्यकृतीने पन्नाशीची उमर गाठली आहे. गणेशोत्सवामध्ये प्रकाशन झालेल्या या कादंबरीला गणपतीची आणि ही कादंबरी ज्यांच्या हस्ते प्रकाशित झाली त्या महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा म्हणजेच गजाननाचा आशीर्वाद लाभला होता. वयाच्या पंचविशीत ही कादंबरी सिद्ध करणारे लेखक हे ‘‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत’ या नावानेच ख्यातकीर्त झाले.
इंग्रजीसह पाच भाषांमध्ये अनुवादित झालेली, अनेक आवृत्त्या पाहण्याचे भाग्य लाभलेली आणि भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्कारासह नोबेल पुरस्कारासाठी शिफारस झालेली ‘मृत्युंजय’ ही कादंबरी यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. १९६७ मध्ये गणेशोत्सवामध्ये प्रकाशित झालेल्या ‘मृत्युंजय’ कादंबरीची तीन हजार प्रतींची पहिली आवृत्ती अवघ्या साडेतीन महिन्यांत संपली आणि एखादी साहित्यकृती लेखकाची ओळख म्हणूनच प्रस्थापित होण्याचे भाग्य शिवाजी सावंत यांना लाभले.
कोल्हापूरच्या आजरा येथे शेतकरी कुटुंबात शिवाजी सावंत यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण घेत असताना वार्षिक स्नेहसंमेलनातून साकारलेल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेपासून त्यांना महाभारत आणि प्राचीन वाङ्मयाच्या वाचनाचा छंद दडला. शॉर्टहँडचा कोर्स करून न्यायालयात नोकरी लागली असताना ती त्यांनी सोडली. वाचन आणि अभ्यासासाठी त्यांनी मेन राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. शिवभक्त भालजी पेंढारकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेकांनी त्यांना अर्थसाह्य़ केल्यामुळे त्यांनी कुरुक्षेत्राचा प्रवास केला. तेथून परतल्यावर वयाच्या २३ व्या वर्षी शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’च्या लेखनास प्रारंभ केला आणि दीड हजार पानांचे हस्तलिखित साकारले गेले. आर. के. कुलकर्णी यांनी सावंत यांचा ग. दि. माडगूळकर यांच्याशी परिचय करून दिला आणि गदिमांनी कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या अनंतराव कुलकर्णी यांच्याकडे या पुस्तकाची शिफारस केली. सन १९६७ च्या गणेशोत्सवात ‘मृत्युंजय’चे गदिमांच्याच हस्ते प्रकाशन झाले होते.
या कादंबरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त मासिक जडण-घडण आणि सह्य़ाद्री प्रकाशनतर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मृत्युंजयकारांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १८ सप्टेंबर रोजी पुण्यातील कार्यक्रमापासून सुवर्णमहोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, व्याख्याने, निबंध स्पर्धा, वाचक मेळावे अशा विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. वाचन प्रचाराच्या कामाला गती मिळावी यासाठी प्रयत्न असून याकामी ‘मृत्युंजय’कारांच्या पत्नी मृणालिनी सावंत, मृत्युंजय प्रतिष्ठान आणि मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रंथालय यांचे साहाय्य घेण्यात येणार असल्याचे जडण-घडण मासिकाचे संपादक सागर देशपांडे यांनी कळविले आहे.