पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरसूचीवरील आक्षेप, हरकती ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली. चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिलेले विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन स्वरूपात करता येईल.
ऑनलाइन निवेदन पालकांसाठी केतस्थळावर आणि शाळांसाठी ऑनलाइन प्रणालीतील शाळा लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. १४ मेनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे त्रुटी, आक्षेपांचे निवेदन दिल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अर्जातील माहितीत, तसेच शाळा माहिती प्रपत्रातील विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम, शाळेचे क्षेत्र यात दुरुस्ती करण्यासाठीही १४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. संबंधित अर्ज ऑनलाइनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती
http://www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचे परिपत्रकाद्वारे
दरम्यान, यंदा पाचवी आणि आठवीसह चौथी आणि सातवी या इयत्तांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यरातील ३६ जिल्ह्यांमध्ये चौथी आणि सातवीच्या मिळून एकूण ११ लाख ५५ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी दिली.
इयत्ता चौथीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ६ लाख ९४ हजार ५९७ विद्यार्थांपैकी ६ लाख ५७ हजार ७७ विद्यार्थांनी परीक्षा दिली. तर इयत्ता सातवीच्या ४ लाख ६२ हजार १३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी चार लाख ३३ हजार ८५७ विद्यार्थांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे उत्तरसूचीकडे लक्ष लागले होते.
