पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी, इयत्ता आठवी या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. शाळांना विद्यार्थ्यांता निकाल शाळा लॉगिनमधून, तर पालकांना संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या ५ वी व ८ वीच्या मुख्य शिष्यवृत्ती परीक्षांसोबतच शासकीय विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षांचा निकालही जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये २७ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव इत्यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी २७ मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध करण्यात आला आहे. ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठवल्यास त्याचा स्वीकार केला जाणार नाही. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी, ग्रामीण), अभ्यासक्रमात दुरुस्ती करायची असल्वायास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंतीपत्र पूर्ण माहिती नमूद करून puppsshelpdesk@gmail.com या ईमेलद्वारे २७ मेपर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय शाळेच्या लॉगिनमध्ये ३० दिवसांत कळवण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पद्धतीने आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अधिक माहिती http://www.mscepune.in व https://puppssmsee.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
दरम्यान, यंदा पाचवीच्या ६ लाख ५७ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९६.६१ टक्के, म्हणजेच ६ लाख ३४ हजार ९२० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. तर आठवीच्या ३ लाख ८७ हजार ६२३ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७३ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी (९६.४७ टक्के) परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर परीक्षा परिषदेने अंतरिम उत्तरसूची, अंतिम उत्तरसूची जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी, पालकांचे निकाल जाहीर होण्याकडे लक्ष लागले होते. आता अंतरिम निकाल जाहीर करण्यात आल्याने शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांची कल्पना शिक्षक, शाळांना मिळू शकणार आहे.
