‘महावितरण’ने राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेला ९,३१२ कोटी रुपयांचा व २१ टक्के वीजदरवाढीच्या प्रस्तावाला वीजग्राहकांनी मोठय़ा संख्येने विरोध करावा, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘महावितरण’ने आयोगाकडे सादर केलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने नुकतीच वीजदरात २० टक्के कपात केल्याने काहीसा दिलासा मिळाला असतानाच नव्याने दाखल झालेल्या प्रस्तावामुळे ग्राहकांना पुन्हा झटका बसला आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी विविध अक्षेप घेतले आहेत. आयोगाने यापूर्वी मंजूर केलेल्या विविध रकमांसह एकूण वाढ १२,६७२ कोटी रुपये म्हणजे २८.६ टक्के होते. त्यामुळे वीजग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीपूर्वी हजारोच्या संख्येने ग्राहकांनी या प्रस्तावावर हरकत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वीजग्राहकांच्या दुर्दैवाने व जनतेच्या दबावाअभावी वीज नियामक आयोग महावितरण व राज्य शासनाच्या हातातील बाहुले बनले आहे, असा आरोपही होगाडे यांनी केला आहे. कोणत्याही प्रकारची तांत्रिक छाननी व तपासणी न करता सहा फेब्रुवारी रोजी दाखल झालेला प्रस्ताव सात फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला. विभागवार जाहीर सुनावण्या हेतुपुरस्सर टाळण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये एकच सुनावणी ठेवण्यात आली आहे. हे सर्व पाहता सुनावणी होण्यापूर्वीच येत्या आठ दिवसांमध्ये ७५ टक्के म्हणजे अंदाजे ७००० कोटी रुपयांच्या दरवाढीस मंजुरी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही होगाडे यांनी म्हटले आहे.