पुणे : ‘महावितरण’च्या वीजदरात कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य वीज नियामक आयोगाने दिला. महावितरणच्या पुणे विभागात सुमारे ३२ लाख ६० हजार घरगुती ग्राहक आहेत. त्यातील १०० युनिट्सपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या ७० टक्के सुमारे २२ लाख ८२ हजार ग्राहकांना वीजदर कपातीचा अधिक लाभ होणार असून त्यांच्या वीज देयकामध्ये प्रति युनिट ०.८३ रूपये कमी होणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
‘महावितरण’च्या घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व संवर्गातील ग्राहकांच्या वीजदरात १ जुलैपासून पाच वर्षांसाठी कपात करण्याचा आदेश राज्य वीज नियमाक आयोगाने दिला आहे. घरगुती ग्राहकांसाठी ही दरकपात १० टक्क्यांपर्यंत असून दरमहा १०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्या ७० टक्के ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
महावितरणच्या पुणे विभागात ३२ लाख ६० हजार ९५३ घरगुती ग्राहक आहेत. त्यातील ७० टक्के सुमारे २२ लाख ८२ हजार ६६७ ग्राहक १०० युनिट्सपेक्षा कमी वीज वापर करतात. वीजदर कपातीमुळे त्यांना १० टक्के अधिक लाभ मिळणार असल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली. आगामी पाच वर्षांत हीच सवलत सुमारे २६ टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
‘महावितरण’ने भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन ‘रिसोर्स ॲडेक्वसी प्लॅन’ तयार केला असून त्यानुसार २०३० पर्यंत राज्याची विजेची क्षमता ८१ हजार मेगावॅट होण्यासाठी ४५ हजार मेगावॅटचे वीजखरेदी करार केले आहेत. त्यापैकी ३१ हजार मेगावॅट वीज रिन्युएबल अर्थात नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांमधून मिळणार आहे. ही वीज अत्यंत किफायतशीर दरात मिळणार असल्याने आगामी पाच वर्षात महावितरणचे वीजखरेदीचे ६६ हजार कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे कंपनीला वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडता आल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.