वीज देयकांचे साडेदहा हजार धनादेश दरमहा परत

धनादेश बँकेतून परत येण्यात पुणे आणि भांडूप परिमंडलातून दरमहा सुमारे १७०० ग्राहकांचा समावेश आहे

महावितरणला डोकेदुखी; देयकाला ८८५ रुपयांचा दंड

पुणे : करोनाच्या कालावधीत वीज देयकांची थकबाकी वाढल्याने अडचणीत असलेल्या महावितरणसमोर आणखी एक डोकेदुखी निर्माण झाली आहे. देयकांपोटी ग्राहकांकडून जमा केले जाणारे धनादेश बँकेतून परत येण्याचे (बाउन्स) प्रकार राज्यात वाढले असून, सध्या दरमहा दहा ते साडेदहा हजार धनादेश विविध कारणांनी परत येत आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक वीज देयकांसाठी बिलंब आकार आणि जीएसटीसह ८८५ रुपयांचा दंड केला जात आहे. हा दंड पुढील वीज देयकात इतर आकार म्हणून समाविष्ट केला जात आहे.

वीज देयकांचा भरणा करण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाइन सुविधा उपलब्ध असतानाही राज्यात अद्यापही साडेचार लाखांहून अधिक ग्राहक देयकांचा भरणा करण्यासाठी धनादेश देत आहेत. त्यात पुणे परिमंडलातील १ लाख ८ हजार, भांडूप परिमंडलातील १ लाख ४ हजार, कल्याण परिमंडलातील ७३ हजार तसेच नाशिक, कोल्हापूर, बारामती, नागपूर परिमंडलातील २४ ते २९ हजार ग्राहकांचा समावेश आहे. धनादेश बँकेतून परत येण्यात पुणे आणि भांडूप परिमंडलातून दरमहा सुमारे १७०० ग्राहकांचा समावेश आहे. नागपूर १००, तर बारामती परिमंडलातून दरमहा सुमारे ९०० धनादेश परत येत आहेत.

धनादेश परत येणाऱ्या सर्व ग्राहकांच्या पुढील देयकामध्ये दंडाची रक्कम समाविष्ट केली जाते. हा दंड टाळण्यासाठी सोपा पर्याय असलेल्या ऑनलाइनद्वारे देयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणचे http://www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारे चालू, मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा भरणा लघुदाब वीजग्राहकांना घरबसल्या करता येतो.  त्यासाठी देयकामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड वगळता सर्व ऑनलाइनद्वारे होणारा भरणा निशुल्क आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती किंवा सोसायटय़ांच्या वीजग्राहकांचे देयक दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट देयक भरण्याची सोय उपलब्ध आहे.

धनादेश परतण्याची कारणे वीज देयकाचा धनादेश बँकेतून परत आल्यास संबंधिताला दंडासह आता पुढील सहा महिने धनादेशाद्वारे देयक भरण्याची परवानगी दिली जात नाही. खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसणे हे धनादेश परतण्याचे प्रमुख कारण असले, तरी चुकीची तारीख टाकणे, खाडाखोड करणे, चुकीचे नाव आदी कारणांनीही अनेक धनादेश परत येत आहेत. धनादेश दिल्यानंतर देयक भरल्याची पावती त्याच दिवशी दिली जाते. मात्र, धनादेश वटल्यानंतरच देयक जमा झाल्याचे ग्राह्य़ धरले जाते, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Msedcl charge penalty on consumers cheques for bill payment bounce zws

ताज्या बातम्या