४,६१५ मेगावॅटच्या निविदा, वीज ग्राहकांना दिलासा

पुणे : नूतनशील ऊर्जा क्षेत्रातून स्वस्तातील वीजखरेदीसाठी महावितरणने राबविलेल्या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एक हजार मेगावॅटसाठी ही प्रक्रिया असताना प्रत्यक्षात स्वस्त दरामध्ये तब्बल ४,६१५ मेगाव्ॉट विजेसाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून निविदा मिळाल्या आहेत. त्यातून गेल्या चार वर्षांच्या तुलनेत सौर आणि पवन-सौर संकरित ऊर्जा स्वस्तात उपलब्ध होणार असून, त्याचा दिलासा सर्वसामान्य वीजग्राहकांना मिळणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून निश्चित प्राधान्य दराने यापूर्वी नूतनशील ऊर्जा खरेदीची प्रक्रिया केली जात होती. आयोगाचा प्राधान्य दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक होता. त्यामुळे महागडय़ा दराने होणाऱ्या वीजखरेदीचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांवर पडत होता. मात्र, राज्य शासनाच्या संमतीने सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातील वीज खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. महावितरणकडून सौर ऊर्जेच्या ५०० मेगावॅट आणि पवन-सौर संकरित ऊर्जेच्या ५०० मेगावॅट वीजखरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. या निविदांना प्रतिसाद देत निविदाधारकांनी सौर ऊर्जेसाठी ३,१६५ मेगावॅट व पवन-सौर संकरित ऊर्जेसाठी १,४५० मेगावॅट विजेच्या निविदा दाखल केल्या. महावितरणने निर्धारित केलेल्या वीजदरापेक्षा या निविदांमध्ये कमी दर मिळाला आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने येत्या २०२५ पर्यंत राज्यात १७ हजार ३६० मेगावॅट नवीन आणि नित्यनूतनक्षम ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने अधिकाधिक नूतनशील ऊर्जेची वीजखरेदी स्पर्धात्मक दराने करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नियोजनातून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून नूतनशील वीजखरेदीसाठी महावितरणला यंदा प्रथमच गेल्या चार वर्षांतील स्वस्त दर प्राप्त झालेला आहे.

प्रतियुनिट ५० पैशांनी वीज स्वस्त

स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतून नूतनशील ऊर्जास्रोतांतील वीज स्वस्तात मिळत आहे. याच प्रक्रियेद्वारे डिसेंबर २०१८ मध्ये प्रतियुनिट २.७४ रुपये, नोव्हेंबर २०१९ मध्ये २.८९ रुपये, तर डिसेंबर २०१९ मध्ये २.९० रुपये दर मिळाला होता. या तुलनेत यंदा आणखी स्वस्त दरात वीज उपलब्झ होणार आहे. सौरसाठी प्रतियुनिट २.४२ रुपये आणि पवन-सौरसाठी २.६२ रुपये दर मिळाला आहे. चार वर्षांच्या तुलनेत प्रतियुनिट सुमारे ४० ते ५० रुपयांनी वीज स्वस्त मिळाली आहे.