करोनामुळे नऊ जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ३० लाखांचे सानुग्रह अनुदान

पुणे : पुण्यात महावितरण कंपनीच्या ४५० कर्मचारी, अधिकाऱ्यांना आजवर करोनाची लागण झाली असून, त्यातील ३४४ जण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातलगांना प्रत्येकी ३० लाख रुपयांचे सानुग्रह आनुदान देण्यात आले आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयातील खाट आणि इतर आरोग्यविषयक मदत, आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधण्यासाठी पुणे परिमंडल कार्यालयामध्ये कोविड-१९ समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे परिमंडलातील करोनाबाधित कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मदत करण्यासाठी हा कक्ष काम करीत आहे.

आतापर्यंत पुणे परिमंडलातील ३७४ पुरुष आणि ७६ महिला अशा ४५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ३४४ जण करोनामुक्त झाले असून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या ९ पैकी ७ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ९७ अधिकारी व कर्मचारी रुग्णालय आणि घरी उपचार घेत आहेत.

करोनाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे अभियंता आणि कर्मचारी सुरळीत,अखंडित वीजपुरठ्यासह विविध ग्राहकसेवा देत आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात देखील गेल्या महिन्याभरापासून करोना संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक अधिकारी व कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांतील व्यक्तींना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे परिमंडल कार्यालयात कोविड-१९ समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर हे कक्षप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.