पुणे : वीज ग्राहकांना अधिक जलद आणि दैनंदिन धावपळीतही महावितरणच्य सेवा मिळाव्यात म्हणून ‘व्हॉट्सॲपवर’ सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वीजबिल पाहण्यापासून वीजबिल भरण्यापर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी ग्राहकाला उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातील सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात महावितरणचे ३ कोटी १२ लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. तर पुणे परिमंडलात ग्राहकांची संख्या ३९ लाखांच्या घरात आहे. या सर्व ग्राहकांना १३ मार्चपासून महावितरणच्या व्हॉट्सॲप सेवेचा लाभ मिळणार आहे. पूर्वी दरमहिन्याला येणारे वीजबिल आणि ते भरल्याची पावती घराघरांत फाईलिंग करुन जतन केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महावितरणने मोबाईल ॲपसह संकेतस्थळावर विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या. आता या सर्व सेवा वीजग्राहकांना व्हॉट्सॲपवर उपलब्ध झाल्याने लाखो ग्राहकांना लाभ होत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला.
व्हॉट्सॲपवर उपलब्ध सेवा :
- वीज बिल आणि पेमेंट : ग्राहक आपले चालू वीज बिल पाहू शकतात आणि तिथूनच थेट बिलाचा भरणाही करू शकतात. त्याकरिता डेबिट कार्ड, युपीआय आदींचे पर्याय विचारले जातात.
- ई-बिल आणि पावती : व्हॉट्सॲपवरून डिजिटल बिल (e-bill) डाऊनलोड करण्याची सोय असून, बिल भरल्यानंतर त्याची पावतीही तात्काळ मिळवता येणार आहे.
- तक्रार नोंदणी : वीज पुरवठा खंडित होणे किंवा विजबिलांबाबत तसेच इतर तांत्रिक समस्यांबाबतची तक्रार आता व्हॉट्सॲपवर नोंदवता येणार आहे. त्या तक्रारींची सद्यस्थितीही व्हॉट्सॲपवर तपासता येणार आहे.
- नवीन जोडणी अर्जाचा मागोवा: नवीन वीज जोडणीसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाची सद्यस्थिती काय आहे, हे ग्राहकांना घरबसल्या समजेल.
- गो-ग्रीन सुविधा : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कागदी बिलाऐवजी ई-बिल घेण्याच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत ग्राहक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात किंवा बाहेर पडू शकतात.
- चॅटबॉट सपोर्ट : ग्राहकांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे देण्यासाठी एक ‘इंटरॲक्टिव्ह चॅटबॉट’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘ब्ल्यू टिक’ची खात्री करा
महावितरणकडून व्हॉट्सॲपव अपडेट्ससाठी ९१६७७७७७९१ हा क्रमांक वापरण्यात येत आहे. ग्राहकांनी या क्रमांकावर ‘Hi’ संदेश पाठवल्यावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर हवी असलेली सेवा निवडता येते. महावितरणने हा क्रमांक Verify केला असून, ग्राहकांनी या महावितरणच्या क्रमांकाला ‘ब्ल्यू टिक’ असल्याची खात्री करावी. तसेच कंपनीचे संकेतस्थळ, ग्राहक तक्रारीसाठीचा ईमेल आदी माहितीही ‘बायो’मध्ये उपलब्ध असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
‘पेपरलेस सेवांवर महावितरणचा भर’
‘वसुली करतेवेळी वीजबिल मिळाले नाही, मिळाल्यावर भरतो, अशा सबबी ग्राहक द्यायचे. आता ग्राहकांना हव्या असणाऱ्या वीजबिलाची माहिती व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरण दिवसेंदिवस ‘स्मार्ट’ होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘Ease of Doing Business’ ही संकल्पना महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सत्यात उतरवली. पेपरलेस व्यवहरांकडे वाटचाल म्हणून ग्राहकांनीही छापील वीजबिलाऐवजी डिजीटल सेवांवर भर द्यावा,’ असे आवाहन महावितरणच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले.
